सत्ताधाऱ्यांच्या काळात ठाणे शहराची ओळख बदलली; संजय राऊतांची महायुतीवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 06:20 IST2026-01-06T06:20:46+5:302026-01-06T06:20:46+5:30
महाराष्ट्राचे लक्ष मुंबईनंतर ठाण्याकडे लागले आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

सत्ताधाऱ्यांच्या काळात ठाणे शहराची ओळख बदलली; संजय राऊतांची महायुतीवर टीका
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाणे शहराची ओळख सध्या विकासाची नव्हे, तर भ्रष्टाचार, ड्रग्स आणि गुन्हेगारीचे केंद्र म्हणून होत असल्याचा गंभीर आरोप उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमवार केला. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
महाराष्ट्राचे लक्ष मुंबईनंतर ठाण्याकडे लागले आहे. तुतारीवाले वाटेत आहेत, मात्र तुतारी थोडी जड आहे, असा टोला लगावत राऊत यांनी मनसे- उद्धवसेना युतीचा प्रचार ठाण्यात सुरू झाल्याचे जाहीर केले. ठाणेकरांसाठी संयुक्त वचननामा प्रसिद्ध करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. ठाण्यातील एकंदर परिस्थिती गंभीर असल्याचे सांगत राऊत म्हणाले, ठाणे हळूहळू ड्रग्सचे अड्डे बनत चालले आहे. ही केवळ कायदा-सुव्यवस्थेची नव्हे, तर एक पिढी उद्ध्वस्त करणारी बाब आहे. या विषयावर ठाणेकरांनी मतदान केले पाहिजे.” ड्रग्सचे जाळे साताऱ्यापर्यंत पोहोचल्याचा आरोप केला.
राऊत म्हणाले की, आमचे उमेदवार पोलिसांच्या मदतीने उचलले जात आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे गृहखाते नेमके काय करत आहे? ठाण्यात रेहमान डाकूसारखे गुन्हेगार खुलेआम वावरत असल्याचाही आरोप त्यांनी केला. महापालिका कोणी लुटली? कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत, पण कोट्यवधींच्या इमारती उभ्या राहिल्या. कल्याण-डोंबिवली आणि ठाणे महापालिका लुटल्या म्हणूनच ही संपत्ती उभी राहिली. ठाण्याची ओळख आता ‘नमो ठाणे’ अशी करण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या ठाण्यात हे फलक लावताना एकनाथ शिंदे यांना लाज वाटली पाहिजे.