ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी ‘टपाली मतदान’ कक्ष सुरू; २१८४ अर्ज प्राप्त

By सुरेश लोखंडे | Published: April 16, 2024 04:40 PM2024-04-16T16:40:24+5:302024-04-16T16:41:06+5:30

जिल्ह्यातील तीन लाेकसभा मतदारसंघाच्या निवडणुका हाती घेण्यात आलेल्या आहेत.

postal voting booths open for thane lok sabha constituency 2184 applications received | ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी ‘टपाली मतदान’ कक्ष सुरू; २१८४ अर्ज प्राप्त

ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी ‘टपाली मतदान’ कक्ष सुरू; २१८४ अर्ज प्राप्त

सुरेश लोखंडे, ठाणे : जिल्ह्यातील तीन लाेकसभा मतदारसंघाच्या निवडणुका हाती घेण्यात आलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने आज टपाली मतदान कक्षाला सुरूवात केली आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी या कक्षाला भेट देऊन त्याची पाहाणी केली. यावेळी घेतलेल्या आढाव्यामध्ये टपाली मतदान अर्ज नमुना १२ व नमुना १२अ आदींचे मिळून दाेन हजार १८४ अर्ज या कक्षाला प्राप्त झाल्याचे उघड झाले.

या ठाणे लाेकसभेसाठी हे टपाली मतदान कक्ष ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आले आहे. या कक्षाला शिनगारे यांनी अचानक भेट देऊन टपाली मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला. यावेळी ठाणे लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये धुळे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी (टपाली मतदान) संभाजी अडकुणे, तहसीलदार श्रद्धा चव्हाण आदी उपस्थित होते. या कक्षामध्ये २० मे रोजी होणाऱ्या मतदानास अनुसरून टपाली मतदानसंबंधीचे फॉर्म ठेवण्यात आले आहेत. या कक्षा मार्फत टपाली मतदानाला लागणारे अर्ज नमुना १२, नमुना १२ अ व नमुना १२ ड या अर्जांचे वितरण सध्या सुरू आहे.

 या कक्षाकडून टपाली मतदान अर्ज नमुना १२ हा नाशिक, धुळे, पालघर, मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यात राहणारे व ठाणे जिल्ह्यात कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मतदान करण्यासाठी देण्यात येत आहे. त्यानुसार आतापर्यंत या टपाली मतदान करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून ८६१ अर्ज जमा झाले. तर ठाणे जिल्ह्याअंतर्गत असलेल्या विधानसभा मतदार संघ मीरा भाईंदर व बेलापूर या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना अर्ज नमुना १२ अ अंतर्गत निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र दिले जाते, त्याद्वारे हे कर्मचारी मतदार यादीत नाव असलेल्या ठिकाणी टपाली मतदानाद्वारे मतपत्रिका पाठवितात. तसे आतापर्यंत एक हजार ३२३ अर्ज आले, असे या आढाव्यात उघड झाले आहे.

जिल्ह्यातील कर्तव्यावर असलेले पोलीस, ८५ वर्ष व त्यापुढील वयोगटातील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग नागरिकांना मतदानासाठी नमुना १२ ड हा अर्ज देण्यात येतो. अशा मतदारांची माहिती जमा करण्याची प्रक्रिया सुरू असून या संबंधीतांमध्ये टपाली मतदान करण्यासंबंधी जनजागृती करण्यात येत आहे. यावेळी पोस्टल बॅलट संदर्भाची माहिती ही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी घेतली.

Web Title: postal voting booths open for thane lok sabha constituency 2184 applications received

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.