‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांनी टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 07:26 IST2025-12-28T07:25:34+5:302025-12-28T07:26:19+5:30
महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेच्या वतीने डोंबिवली आणि कल्याण पूर्वेत शुक्रवारी ‘विजय निर्धार’ सभा पार पडली.

‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांनी टीका
कल्याण : आमचा ब्रँड आहे असे सांगणाऱ्यांचा कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत बँड वाजवा, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केले. ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांनी ही टीका केली.
महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेच्या वतीने डोंबिवली आणि कल्याण पूर्वेत शुक्रवारी ‘विजय निर्धार’ सभा पार पडली. दोन्ही सभेला शिंदेसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे, आ. राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, माजी नगरसेवक विश्वनाथ राणे, मल्लेश शेट्टी, रवी पाटील, नीलेश शिंदे, रमेश जाधव, आदी उपस्थित होते.
कल्याणच्या विजय निर्धार सभेत अखिल भारतीय कोळी महासंघाचे अध्यक्ष देवानंद भोईर यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यांनी शिंदे यांच्या डोक्यावर कोळी समाजाची टोपी घातली.
डोंबिवलीच्या विजय निर्धार सभेत विकास म्हात्रे यांना भाषण करण्याची संधी दिली. म्हात्रे हे भाजपमधून शिंदेसेनेत आले. म्हात्रे यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांनी त्यांचे भाषण आटोपते घेतले. शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
शिंदे हे दीपेश म्हात्रे यांच्या कार्यालयासमोरून जात असताना म्हात्रे यांनी त्यांची विचारपूस केली. म्हात्रे शिंदेसेनेतून उद्धवसेनेत गेले हाेते. त्यानंतर ते भाजपमध्ये गेले.