आईवडिलांचे ‘संकल्पपत्र’ घेण्यास मनाई!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 05:43 AM2019-04-16T05:43:57+5:302019-04-16T05:44:22+5:30

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या टक्केवारीत भरीव वाढ व्हावी, यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्येदेखील विद्यार्थ्यांद्वारे त्यांच्या आईवडिलांना मतदानाची जाणीव करून देण्यात आली.

Parents 'circular' prohibited! | आईवडिलांचे ‘संकल्पपत्र’ घेण्यास मनाई!

आईवडिलांचे ‘संकल्पपत्र’ घेण्यास मनाई!

Next

- सुरेश लोखंडे 

ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या टक्केवारीत भरीव वाढ व्हावी, यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्येदेखील विद्यार्थ्यांद्वारे त्यांच्या आईवडिलांना मतदानाची जाणीव करून देण्यात आली. ‘मतदान करणारच’ असे त्यांचे ‘संकल्पपत्र’ स्वाक्षरीसह भरून घेण्यात आले. परंतु, त्यापासून आचारसंहितेचा भंग होत असल्याची जाणीव होताच निवडणूक यंत्रणेने ते पत्र भरून घेण्यास आता मनाई केली आहे. यामुळे जिल्ह्यातील शिक्षकवर्गद्विधा मन:स्थितीत दिसून येत आहे.
मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहे. त्यापैकी एक ‘संकल्पपत्र’ हा उपक्रम आहे. जिल्ह्यातील माध्यमिक, प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून मतदार आईवडिलांना संकल्पपत्र दिले जात आहे. त्याद्वारे शिक्षण देत असल्याचे आभार मानण्यासह देशाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी, भारतीय लोकशाही मजबूत करण्यासाठी आपल्या कुटुंबातील १८ वर्षांवरील सर्व मतदारांनी मतदान अवश्य करावे, असा संकल्प करण्याची विनंती या विद्यार्थ्यांकडून आईवडिलांना करण्यात आली. या पत्रास उत्तर म्हणून या लोकसभा निवडणुकीत मी अवश्य मतदान करेन आणि माझ्या परिचितांनाही मतदान करण्यास प्रोत्साहित करेन, असे पालकांचे ‘संकल्पपत्र’ नाव, पत्ता व स्वाक्षरीसह शाळेत जमा करावे लागले. जिल्ह्यातील बहुतांशी शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी हे संकल्पपत्र शाळेत जमा केले आहे. काही विद्यार्थ्यांनी ते अद्याप शाळेत दिले नाही.
परंतु, आता विद्यार्थ्यांच्या या संकल्पपत्रास मनाई करण्यात आली आहे. आचारसंहितेचा भंग होत असल्याची जाणीव निवडणूक यंत्रणेस झाली आणि विद्यार्थ्यांकडून मतदानासाठीचे ‘संकल्पपत्र’ घेण्यात येऊ नये, असे जिल्ह्यातील शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आदींना भ्रमणध्वनीद्वारे शिक्षण विभागाने कळवले आहे.
>तोंडी आदेशामुळे संभ्रम
निवडणुकीच्या या काळात तोंडी आदेशास स्थान नसल्यामुळे शिक्षकवर्ग गोंधळात सापडला आहे. जिल्ह्याच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ‘संकल्पपत्र’ घेऊ नये, असे दूरध्वनीद्वारे कळवल्याचे मेसेज शिक्षण विभागाने मुख्याध्यापक व शिक्षक यांना कळवले आहे. यामुळे मागील काही दिवसांपासून माध्यमिक व प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांकडून ‘संकल्पपत्र’ घेण्याचे थांबवून विद्यार्थ्यांद्वारे परिवारातील मतदान जनजागृतीला रोख लागला आहे.

Web Title: Parents 'circular' prohibited!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.