‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 06:58 IST2025-12-27T06:58:04+5:302025-12-27T06:58:15+5:30
ठाण्यात राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार)ला भाजप-शिंदेसेनेने युतीमध्ये स्थान न दिल्याने निवडणूकपूर्व युती ही त्या पक्षाची गरज आहे.

‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यात राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार) एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली असली, तरी निवडणुकीपूर्वी ही युती व्हावी, ही राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार)ची गरज आहे, तर निवडणुकीनंतर ही युती झाली, तर राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार)करिता लाभदायक ठरणार आहे.
ठाण्यात राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार)ला भाजप-शिंदेसेनेने युतीमध्ये स्थान न दिल्याने निवडणूकपूर्व युती ही त्या पक्षाची गरज आहे. कारण, या पक्षाची ठाण्यात मर्यादित ताकद आहे. परंतु, आताच युती केली, तर राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार)च्या ताकदीवर राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार) पक्ष बाळसे धरण्याची भीती वाटते.
पुणे, पिंपरी-चिंचवड पालिकेत राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) पक्ष एकत्र आले आहेत. त्याच धर्तीवर ठाण्यातही हे दोन्ही गट एकत्र येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
महायुतीची काय आहे रणनीती?
भाजप-शिंदेसेनेनी ठाकरे बंधूंच्या युतीचा सामना करावा व मुस्लीमबहुल अथवा अनुसूचित जाती-जमाती बहुल प्रभागांत राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार) पक्षाने राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) पक्ष अथवा काँग्रेस यांना टक्कर द्यायची, अशी महायुतीची रणनीती आहे.
ठाण्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) पक्षाच्या संभाव्य युतीत खोडा घालणे व पक्षाची ताकद शोषून बाळसे धरणे ही राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार)ची खेळी असल्याचे दिसत आहे.
निवडणुकीपूर्वी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आणि जागा वाढल्या, तर महापालिकेतील विविध पदांवर दोन्ही गट दावा करतील. राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार)ला विरोधी बाकावर बसवून विरोधी पक्षनेतेपद महायुतीमधील घटक पक्षालाच मिळेल, अशी भीती राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) पक्षाला वाटते.