विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 17:47 IST2026-01-01T17:46:34+5:302026-01-01T17:47:22+5:30
निवडणूक आयोग केवळ नावापुरते स्वायत्त संस्था आहे. परंतु त्यात काम करणारे अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतले आहेत असा आरोपही मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला.

विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
ठाणे - राज्यात २९ महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना आता ठिकठिकाणी उमेदवारी अर्जाची छाननी सुरू आहे. त्यात विरोधकांचे अर्ज बाद झाल्याने महायुतीचे अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे. कल्याण डोंबिवलीत भाजपाचे ५ तर शिंदेसेनेचे ४ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ठाण्यातही विरोधकांचे अर्ज बाद झाले आहेत. त्यानंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेत सत्ताधारी निवडणूक अधिकाऱ्यांना हाताशी धरून ठरवून अर्ज बाद करत असल्याचा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला आहे.
मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले की, निवडणूक अधिकाऱ्यांकडून अनेक ठिकाणी पक्षपातीपणा करण्यात येत आहे. त्यात बरेच अर्ज बाद झाले आहेत. पडताळणी होण्याच्या अर्ध्या तास आधी उमेदवारांचे अर्ज डिस्पले केले जातात. त्यानंतर त्यावर आक्षेप घेतला जातो. परंतु ठाण्यात सकाळी ११ ऐवजी ३.३० वाजता हे अर्ज बाहेर लावले. त्यात शिंदेसेनेच्या उमेदवारांच्या अर्जात निरंक जागा होत्या. जिथे काहीच भरले नव्हते. नियमानुसार जर एखादी जागा रिक्त ठेवली असेल तर तो बाद होतो. यावर विरोधकांनी आक्षेप घेतला तेव्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली असा आरोप त्यांनी केला.
तसेच सत्ताधारी एकही अर्ज बाद केले नाहीत. विरोधकांचे आणि अपक्षांचे अनेक अर्ज बाद करण्यात आले. हे सगळे पाहता ही संपूर्ण निवडणूक यंत्रणा वाईटरित्या चालवली जात आहे. ठाणे महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी हे निवडणूक अधिकारी असतात. या लोकांचे सत्ताधारी नेत्यांसोबत साटेलोटे असते. सत्ताधारी नेते आणि प्रशासकीय नेते मिळून ही निवडणूक प्रक्रिया मलिन करतात. त्यामुळे अनेक लोकांचे अर्ज बाद झाले. गेले १० वर्ष हे लोक मेहनत घेत होते. त्यांचे करिअर या भ्रष्ट यंत्रणेकडून बर्बाद करण्यात आले. जर अशाच प्रकारे निवडणुका होत असतील तर आम्ही निवडणूक लढायच्या कशाला? असा प्रश्न मनसे नेते अविनाश जाधव यांनी विचारला आहे.
दरम्यान, लढायची ताकद नाही. अपक्षांना खरेदी करायचे आणि त्यातून कुणी उमेदवार उरले तर निवडणुकीत पैसा ओतायचा. सत्तेचा वापर, दबाव आणि पैसे वापरून तरुणांचे करिअर बर्बाद करायचे हे काम सत्ताधारी करतात. हेच जर करायचे असेल तर राजेशाही घोषित करा. लोकशाहीच्या बाता कशाला करायच्या. निवडणूक आयोग केवळ नावापुरते स्वायत्त संस्था आहे. परंतु त्यात काम करणारे अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतले आहेत असा आरोपही मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला.