ठाकरे बंधू आणि शिंदेसेनेतील भांडण मीरा भाईंदरमध्ये भाजपासाठी ठरले गेमचेंजर; तब्बल २८ जागांवर झाला फायदा 

By धीरज परब | Updated: January 17, 2026 14:56 IST2026-01-17T14:49:52+5:302026-01-17T14:56:28+5:30

Mira Bhayander Municipal Corporation Election: दोन्ही सेनेच्या लढाईत बहुरंख्य मराठी मतांची विभागणी होऊन भाजपला तब्बल २८ जागांवर फायदा झाला आहे. त्यामुळे भाजपाने जिंकलेल्या ७८ जागां पैकी तब्बल २८ जागा ह्या भाजपासाठी बोनस ठरल्या आहेत. अन्यथा भाजपा ५० शीच्या पार जाणे अवघड असल्याचे समोर आले आहे. 

Mira Bhayander Municipal Corporation Election: The fight between Thackeray brothers and Shinde Sena became a game changer for BJP in Mira Bhayandar; It gained in as many as 28 seats. | ठाकरे बंधू आणि शिंदेसेनेतील भांडण मीरा भाईंदरमध्ये भाजपासाठी ठरले गेमचेंजर; तब्बल २८ जागांवर झाला फायदा 

ठाकरे बंधू आणि शिंदेसेनेतील भांडण मीरा भाईंदरमध्ये भाजपासाठी ठरले गेमचेंजर; तब्बल २८ जागांवर झाला फायदा 

- धीरज परब 
मीरारोड - दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने उद्धवसेना - मनसे आणि शिंदेसेना यांच्यातील भांडण हे मीरा भाईंदर मध्ये भाजपासाठी गेमचेंजर ठरले आहे. दोन्ही सेनेच्या लढाईत बहुरंख्य मराठी मतांची विभागणी होऊन भाजपला तब्बल २८ जागांवर फायदा झाला आहे. त्यामुळे भाजपाने जिंकलेल्या ७८ जागां पैकी तब्बल २८ जागा ह्या भाजपासाठी बोनस ठरल्या आहेत. अन्यथा भाजपा ५० शीच्या पार जाणे अवघड असल्याचे समोर आले आहे. 

उद्धव व राज ठाकरे बंधू एकत्र आल्याने त्याचा मतदारांवर चांगला परिणाम होणार हे जाणवत होतेच. मराठी आणि मुंबई तोडण्याचा मुद्दा ठाकरे बंधूनी जास्तच आक्रमकपणे घेतला. मात्र मीरा भाईंदर सारख्या शहरी भागातील उत्तर भारतीय, राजस्थानी, गुजराती, जैन व अन्य भाषिक समाजाचे बहुतांश भागात असलेले प्राबल्य पाहता त्या मतदार वर्गात ह्या आक्रमक भूमिकेमुळे असुरक्षितता आणि नाराजी निर्माण झाली व त्याचा फायदा भाजपाने करून घेतला. 

मीरा भाईंदर मध्ये उद्धवसेनेचे एखाद  दोन प्रभाग वगळता फारसे प्राबल्य राहिले नव्हते. मनसेचे तर नव्हतेच. मात्र ठाकरे बंधूंच्या युती मुळे मराठी मते बऱ्या पैकी एकत्र येऊन मीरा भाईंदर मधील शिंदेसेनेचे हक्काचे मानले जाणारे प्रभाग ढासळतील याचा अंदाज होता. भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांनी ती बाब हेरली. उद्धवसेना - मनसे जास्तीत जास्त जागांवर शिंदेसेनेसमोर लढण्यासाठी उद्धवसेनेच्या काहींना भाजपा कडून खतपाणी घातले गेले. त्यातूनच उद्धवसेनेने ताकद नसताना देखील अवास्तव जागांची मागणी करत आडेबाजी चालवली व काँग्रेस बरोबर आघाडी होऊ नये आणि भाजपाला फायदा व्हावा असे आरोप झाले. मनसेचे शहराध्यक्ष संदीप राणे यांनी उद्धवसेनेच्या दोघा पदाधिकाऱ्यांवर आरोप केल्याने त्यास दुजोरा मिळाला. निकालात देखील उद्धवसेने मुळे भाजपाला मोठा फायदा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.   

मराठी प्राबल्य असलेल्या भाईंदर पूर्वेच्या प्रभाग १० मध्ये शिंदेसेनेच्या पूजा आमगावकर ह्या अवघ्या ८ मतांनी पराभूत झाल्या. येथे उद्धवसेनेने तब्बल २,३२९ मते घेऊन भाजपाच्या विजयात मोठा हातभार लावला. याच प्रभागात शिंदेसेनेच्या  माजी नगरसेविका तारा घरत यांचा ४३३ मतांनी भाजपने पराभव केला. उद्धवसेनेला २,४१३ मते मिळाली. प्रभाग १० चे शिंदेसेनेचे पॅनल पूर्ण पराभूत झाले. 

प्रभाग ११ मध्ये शिंदेसेनेचे पॅनल असताना ४ पैकी केवळ वंदना पाटील ह्याच निवडून आल्या. अ मधून शिंदेसेनेच्या ममता म्हात्रे ह्या भाजपा कडून ६८० मतांनी पराभूत झाल्या. येथे मनसे - उद्धवसेनेने ४,५९६ मते घेतली. क मधून विकास पाटील हे १,०३६ मतांनी हरले. येथे उद्धवसेनेने  ३,५४५ मते घेतली. ड मधून माजी उपमहापौर प्रवीण पाटील हे अवघ्या २०१ मतांनी हरले. मनसे - उद्धवसेना युतीने तब्बल ४,२८३ मते घेतली. 

प्रभाग ३ मध्ये शिंदेसेनेचे दिनेश नलावडे हे ७९२ मतांनी हरले. उद्धवसेनेने २,३४५ मते घेतली. राजेश वेतोस्कर हे अवघ्या १५ मतांनी हरले तर उद्धवसेनेने ३,८२५ मते घेतली. कविता मांडवकर २३०० मतांनी हरल्या. येथे उद्धवसेनेने ३,९१५ मते घेतली. 

प्रभाग २३ मध्ये शिंदेसेनेच्या वैशाली म्हात्रे ह्या अवघ्या ५३५ मतांनी पडल्या. त्यांना ८,०२३ मते मिळाली. तर उद्धवसेनेने येथून २,२०४ मते घेतली. क मध्ये भाजपाचा उमेदवार जिंकला. तर अ मध्ये ९,४७० मते घेणाऱ्या तेजस्वी पाटील अवघ्या २८७ मतांनी पराभूत झाल्या. या प्रभागात दोन्ही सेनेच्या विभागणीचा फायदा भाजपाला झाला. 

मीरारोडच्या प्रभाग १३ मध्ये  चारही भाजपाचे नगरसेवक होते. मात्र यंदा शिंदेसेनेने चांगली मोर्चे बांधणी केली होती. परंतु उद्धवसेनेने शिंदेसेनेचे मोर्चे ढिले करून पाडले. येथे शिंदेसेनेच्या उमेदवारांनी ६ ते ७ हजार दरम्यान मते घेतली तर उद्धवसेनेने देखील ३७०० ते ५३०० दरम्यान मते घेऊन भाजपाच्या चारही उमेदवारांचा विजय सुकर केला. 

मीरारोडच्या प्रभाग १४ मध्ये देखील शिंदेसेना आणि उद्धवसेनेच्या मत विभागणीचा भाजपाला फायदा झाला. उद्धवसेनेच्या उमेदवारांनी ३२५० ते ५०५३ दरम्यान मते घेतली. तर शिंदेसेनेने ३,७०० ते ६८०० दरम्यान मते घेतली. दोन्ही सेनेच्या मतांचा विचार करता येथे भाजपाचे तीन आणि अपक्ष १ निवडून आले. 

प्रभाग १८ या मध्ये देखील शिंदेसेना आणि उद्धवसेनेच्या मत विभागणीचा भाजपाच्या एका उमेदवारास फायदा झाला. प्रभाग १५ मद्ये देखील शिंदेसेनेच्या आणि उद्धवसेना - मनसे उमेदवारां मध्ये मतांची विभागणी होऊन भाजपाचे ४ उमेदवार निवडून आले. उद्धवसेनेच्या उमेदवारांना ३,४२७ ते ३,७७१ दरम्यान मते मिळाली. शिंदेसेनेने देखील ३,३०० ते ४,१६२ दरम्यान मते घेतली. 

उद्धवसेना व मनसेच्या मुळे शिंदेसेनेचे मोठे नुकसान झाले. मात्र शिंदेसेनेच्या जागा पाडण्यासाठी भाजपाच्या फायद्याच्या प्रयत्नात उद्धवसेनेला देखील नुकसान सोसावे लागले आहे. काँग्रेस सोबत आघाडी न केल्याने उद्धवसेनेला फटका बसलाच पण प्रभाग ३ मध्ये उद्धवसेनेला त्यांच्या जिल्हा संघटक व माजी गटनेत्या नीलम ढवण यांची जागा गमवावी लागली. प्रभाग ३ ब मध्ये नीलम ढवण यांचा ६५९ मतांनी भाजपने पराभव केला. येथे शिंदेसेने ३,७१८ मते घेतली. 

प्रभाग १६ मध्ये देखील दोन्ही सेनेच्या विभागणी मुळे भाजपाचे ४ नगरसेवक जिंकले. येथे तर शिंदेसेनेच्या जिल्हाप्रमुख राजू भोईर व सहकारी उमेदवारां पेक्षा उद्धवसेनेने जास्त मते घेतली. येथे भाजपच्या विजयी उमेदवारांना ६,६१७ ते ७,७२८ इतकी मते मिळाली. तर दोन्ही सेनेची मिळून येथे ९ हजार ४८० ते ९ हजार ८६८ इतकी मते होतात. येथे उद्धवसेनेच्या उमेदवारांना देखिल फटका बसून  भाजपाचा फायदा झाला आहे. 

ठाकरे बंधू एकत्र येणे आणि उद्धवसेना व शिंदेसेना ५१ जागी एकमेकां विरुद्ध लढल्याने त्यापैकी २८ जागांवर भाजपाला फायदा झाला. त्यातील २३ जागी शिंदेसेनेला नुकसान झाले. शिंदेसेनेचे नुकसान आणि भाजपचा फायदा करून देण्याच्या प्रयत्नात उद्धवसेनेचे देखील  ५ जागी नुकसान झाले. शिवाय उद्धवसेनेने काँग्रेस सोबत आघाडी न करून स्वतःचे नुकसान करून घेतल्याचे मानले जाते.

Web Title : मीरा भायंदर में ठाकरे गुटबाजी: भाजपा को 28 सीटों का फायदा।

Web Summary : मीरा भायंदर में ठाकरे भाइयों के विभाजन से भाजपा को फायदा हुआ, मराठी वोटों के विभाजन के कारण 28 सीटें मिलीं। शिंदे सेना को नुकसान हुआ, जबकि भाजपा ने रणनीतिक रूप से स्थिति का फायदा उठाया। कांग्रेस गठबंधन की अनुपस्थिति से उद्धव सेना को नुकसान हुआ।

Web Title : Thackeray feud in Mira Bhayandar: BJP gains 28 seats.

Web Summary : Thackeray brothers' split benefited BJP in Mira Bhayandar, gaining 28 seats due to Marathi vote division. Shinde Sena suffered losses, while BJP strategically capitalized on the situation. Congress alliance absence hurt Uddhav Sena.