मिरा-भाईंदरमध्ये फेरीवाले, रिक्षावाल्यांच्या मतांसाठी बेगमी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 08:22 IST2026-01-13T08:22:03+5:302026-01-13T08:22:03+5:30
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेरीवाले, रिक्षावाले यांना मतांसाठी साकडे घातले जात आहे.

मिरा-भाईंदरमध्ये फेरीवाले, रिक्षावाल्यांच्या मतांसाठी बेगमी?
लोकमत न्यूज नेटवर्क, मिरारोड : मिरा भाईंदरमध्ये एकही रस्ता-पदपथ असा नाही की जिथे फेरीवाल्यांचे अतिक्रमण नाही. त्यामुळे वाहतूक कोंडीला हातभार लागतो. या कोंडीने मिरा भाईंदरकर त्रासले आहेत. दुसरीकडे बेकायदा रिक्षा स्टैंड, दादागिरीच्या अनेक तक्रारी होत असतात. भाईंदरमध्ये तर मीटरप्रमाणे रिक्षाचालक भाडे घेण्यास उघड नकार देतात व मनमानी भाडे घेतले जाते. मात्र, या सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्याबाबत एकही उमेदवार बोलत नाही, उलट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेरीवाले, रिक्षावाले यांना मतांसाठी साकडे घातले जात आहे.
न्यायालयाने मनाई केलेल्या रेल्वे स्थानक, शैक्षणिक संकुल, रुग्णालय, धार्मिक स्थळांपासूनचा १५० आणि १०० मीटर परिघात देखील सर्रास फेरीवाल्यांचे बस्तान कायम आहे. फेरीवाल्यांच्या जागा व हप्ते यांवरून मीरारोडमध्ये गेल्यावर्षी हत्याकांडही घडले होते.
शहरातील पदपथ व्यापले
मिरा भाईंदर शहरात रस्ते पदपथांवर मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांचे अतिक्रमण झाले आहे. काही वर्षांपूर्वी पालिकेने पत्राशेडमध्ये काही भागात मार्केट बांधून दिली. मात्र, अनेक मार्केट ओस पडली तर अनेक मार्केट बाहेर फेरीवाल्यांनी पुन्हा रस्ते-पदपथावर बस्तान मांडले.
आमच्या समस्या सोडवणार कोण? नागरिकांचा सवाल
मारामारी-वाद तर नेहमीचे आहेत. परंतु महापालिका प्रशासनासह राजकारणी, नेते आदी याप्रकरणी नेहमीच मूग गिळून गप्प बसून असल्याने नागरिकांनादेखील रोजच्या यातना सहन कराव्या लागत आहेत. महापालिका निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात असतानाही याप्रश्नी ठोस कारवाईचे आश्वासन कोणताही पक्ष व नेता, उमेदवार देताना दिसत नाहीत.
उलट याच फेरीवाल्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची मते मिळवण्यासाठी काही नेते-उमेदवारांची धडपड सुरू झाली आहे. भाईंदरमध्ये भाजपच्यावतीने फेरीवाला संघटनेच्या माध्यमातून सभागृहात फेरीवाल्यांची जाहीर सभा सोमवारी घेण्यात आली. यावेळी फेरीवाल्यांना अनेक आश्वासने दिली गेली. रिक्षावाल्यांच्याही भेटीगाठी घेतल्या जात आहेत.
अनेक रिक्षाचालकांच्याही मतांच्या बेगमीसाठी त्यांचे पक्ष प्रवेश करून घेतला जात असून व त्यांना त्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले जात आहे, मात्र नागरिकांना होणाऱ्या या समस्या कोण सोडवणार? असा प्रश्न मीरा भाईंदरकर विचारत आहेत.