सुभेदारांवर विसंबून राहण्याचा बसला फटका; म्हस्केंना कमकुवत समजण्याची चूक
By संदीप प्रधान | Updated: June 6, 2024 13:48 IST2024-06-06T13:48:06+5:302024-06-06T13:48:49+5:30
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या सभांची वानवा; कार्यकर्त्यांची कमतरता

सुभेदारांवर विसंबून राहण्याचा बसला फटका; म्हस्केंना कमकुवत समजण्याची चूक
ठाणे : नारायण राणे यांनी १९ वर्षांपूर्वी शिवसेना सोडली तेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संपूर्ण शिवसेना राणे काँग्रेसमध्ये घेऊन गेले. त्या राजकीय भूकंपापासून उद्धव ठाकरे धडा शिकले नाही. पक्षातील राजकीय सुभेदारांकडे एखादा सुभा सोपवला की, त्याकडे ढुंकूनही पाहायचे नाही. हाच खाक्या सुरू ठेवल्याने एकनाथ शिंदे यांनी उठाव करताच ठाण्यातील शिवसेना ते सोबत घेऊन गेले व त्याचा फटका उद्धवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांना लोकसभेत बसला.
काँग्रेस अथवा भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षात एका जिल्ह्यात, शहरात दोन किंवा चार नेत्यांना पक्षश्रेष्ठी बळ देतात. काँग्रेसच्या मुशीत तयार झालेले शरद पवार यांच्यासारखे नेते राष्ट्रवादी काँग्रेससारखा प्रादेशिक पक्ष चालवताना त्याच कार्यशैलीचे अनुकरण करीत आले. यामुळे एखाद्या नेत्याने पक्ष सोडला तरी जिल्ह्यातील, शहरातील पक्ष संपत नाही. मात्र, बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी पक्षातील काही सुभेदारांना सुभे आंदण दिले. अर्थात गेल्या काही वर्षांत शिवसेनेतही विभागप्रमुख विरुद्ध नगरसेवक, नगरसेवक विरुद्ध आमदार असे सवतेसुभे उभे राहिले. परंतु राणे व शिंदे यांच्या पक्ष फुटीनंतर तरी सिंधुदुर्ग व ठाण्यात शिवसेनेला धक्का बसल्याचे दिसते.
ठाणे-कल्याण आणि वरळी कनेक्शनची चर्चा
ठाणे लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी केवळ एक सभा घेतली. शरद पवार व काँग्रेसचे नेते यांच्या सभा झाल्या नाही. आदित्य ठाकरे हे राजन विचारे यांचा अर्ज दाखल करायला आले. त्यानंतर बाइक रॅलीकरिता आलेल्या आदित्य यांनी प्रत्यक्ष रॅलीत सहभाग घेतला नाही. तिकडे कल्याणमधील वैशाली दरेकर यांच्या उमेदवारीनेही अनेकांना धक्का बसला. ठाणे, कल्याण येथे शिंदे यांना जास्त त्रास द्यायचा नाही म्हणजे विधानसभा निवडणुकीत वरळीत आपली डोकेदुखी वाढणार नाही, अशी सुप्त व्यूहरचना तर झाली नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात झाली.
म्हस्केंना कमकुवत समजण्याची चूक
ठाणे मतदारसंघात दीर्घकाळ उमेदवार जाहीर होत नसल्याने विचारे खुश होते. म्हस्के यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर विचारे यांनी त्यांना कमकुवत समजण्याची चूक केली.
आतापर्यंत विचारे यांच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे हेच सर्व व्यूहरचना आखायचे, पैसे खर्च करायचे. ठाण्याची सुभेदारी ठाकरेंनी आपल्यावर सोपवली आहे व ती राखणे ही आपली जबाबदारी आहे या भावनेतून शिंदे विचारे यांना निवडणुकीत मदत करीत होते.
उद्धवसेनेकडे आमदार, माजी नगरसेवक अशा मातब्बरांची कमतरता, त्यात पक्षाचे नाव व चिन्ह गमावलेले त्यामुळे जुनेजाणते विचारे तुलनेनी नवख्या म्हस्केंकडून पराभूत झाले.