थेट भाजपाच्या विरोधात जाऊन भिवंडीचे महापौर होणारे नारायण चौधरी कोण आहे? ‘अशी’ आहे कारकीर्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 17:31 IST2026-02-20T17:28:19+5:302026-02-20T17:31:27+5:30
Bhiwandi Mayor Election 2026: भाजपाला थेट आव्हान देत महापौरपदी विराजमान होणारे नारायण चौधरी यांची राजकीय कारकीर्द कशी आहे?

थेट भाजपाच्या विरोधात जाऊन भिवंडीचे महापौर होणारे नारायण चौधरी कोण आहे? ‘अशी’ आहे कारकीर्द
Bhiwandi Mayor Election 2026: भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत भाजपाने स्वकीयांच्याच बंडखोरीचा कडवट अनुभव घेतला आहे. भाजपाचे तब्बल सहा नगरसेवक ऐन निवडणुकीच्या वेळी फुटल्याने भाजपाच्या महापौरपदाच्या अधिकृत उमेदवार स्नेहा पाटील यांचा पराभव झाला. विशेष म्हणजे, या बंडखोर गटाने काँग्रेसप्रणीत 'सेक्युलर फ्रंट'ला उघडपणे साथ दिली. भाजपामधील या अंतर्गत कलहाचा फायदा घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या 'सेक्युलर फ्रंट'ने नारायण चौधरी यांना महापौरपदी बसवून भाजपाला खिंडार पाडले. भाजपाला थेट आव्हान देत महापौरपदी विराजमान होणारे नारायण चौधरी यांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
चंद्रपूरनंतर भिवंडी महापालिकेत काय होणार, याकडे राज्याचे लक्ष लागले होते. अखेर महापौरपदाची निवड झाली असून सेक्युलर फ्रंटचे पुरस्कृत उमेदवार नारायण चौधरी हे महापौर झाले आहेत. महापालिकेच्या स्व. विलासरावजी देशमुख सभागृहात दुपारी १२ वाजता सुरू झालेल्या निवडणूक प्रक्रियेनंतर हात वर करून झालेल्या मतदानात चौधरी यांनी स्पष्ट बहुमत मिळवत भाजपाला मोठा धक्का दिला. भिवंडी विकास आघाडीकडून सर्वप्रथम नगरसेवक झालेल्या नारायण चौधरींनी २४ वर्षांच्या राजकीय करिअरमध्ये महापौरपदाला गवसणी घातली.
भिवंडीचे महापौर होणारे नारायण चौधरी कोण आहे?
- नारायण चौधरी हे मूळचे भिवंडीतील रहिवाशी असून २००२ पासून त्यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली.
- सर्वप्रथम २००२ मध्ये ते नगरसेवक झाले. २००२ ते २००७ मध्ये त्यांनी भिवंडी विकास आघाडीमधून नगरसेवक म्हणून कारकीर्द सांभाळली.
- सन २००७ ते २०१२ मध्ये त्यांनी अपक्ष निवडणूक लढवत वेगळा ठसा निर्माण केला. २०१२ मध्ये त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला.
- सन २०१२ ते २०१७ दरम्यान समाजवादी पक्षातून त्यांची पत्नी अलका नारायण चौधरी यांना नगरसेविका म्हणून निवडून आणले.
- सन २०१७ मध्ये नारायण चौधरी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, राज्यातील बदललेल्या राजकीय स्थित्यंतरानंतर २०२५ मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला.
- दोन वर्षाच्या प्रशासकीय राजवटीनंतर नुकतेच झालेल्या भिवंडी महानगरपालिकेतही ते पुन्हा एकदा नगरसेवक म्हणून विजयी झाले.
- भिवंडीतील परिसरात राहणारे नारायण चौधरी शेतकरी असून त्यांनी सुरुवातीला दुधाचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर बांधकाम व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केले.
- व्यवसाय करतानाच ते राजकीय क्षेत्रातही कामकाज करत होते. आता भिवंडी शहरात सुप्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक म्हणून त्यांची ओळख असून नारायण डेव्हलपर्स नावाने त्यांची कंट्रक्शन कंपनी आहे.