KDMC Election 2026: 'निवडणुकीतून माघार घ्या', ठाकरेंच्याच जिल्हाप्रमुखांनी उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला लावले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 13:44 IST2026-01-05T13:41:10+5:302026-01-05T13:44:01+5:30
Kalyan Dombivli Municipal elections 2026: सर्वाधिक बिनविरोध निवडीमुळे कल्याण-डोंबिवली महापालिका राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे. त्यात आता उद्धवसेनेच्या एका उमेदवाराने पक्षाच्या जिल्हाप्रमुखांवर गंभीर आरोप केला आहे.

KDMC Election 2026: 'निवडणुकीतून माघार घ्या', ठाकरेंच्याच जिल्हाप्रमुखांनी उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला लावले?
एका कथित ऑडिओ क्लिपमुळे कल्याण-डोंबिवलीमध्ये उद्धवसेनेमध्ये खळबळ उडाली आहे. उद्धवसेनेच्या उमेदवाराने स्वतःच्याच पक्षाच्या जिल्हाप्रमुखांवर गंभीर आरोप केले आहेत. बिनविरोध निवडणुकीमुळे चर्चेत आलेल्या या महापालिकेत अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. उद्धवसेनेच्या एका उमेदवाराने जिल्हाप्रमुखांनीच अर्ज मागे घ्यायला लावले, असा आरोप केला आहे. व्हायरल होत असलेल्या संभाषणाच्या क्लिपची 'लोकमत' पुष्टी करत नाही.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग क्रमाक २२ मधील उद्धवसेनेच्या उमेदवार वैशाली पोटे यांनी जिल्हाप्रमुख तात्या माने यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
'निवडणुकीतून माघार घ्या', व्हायरल क्लिपमध्ये काय?
जिल्हाप्रमुख तात्या माने यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ही क्लिप वैशाली पोटे यांनी पोस्ट केल्याची चर्चा आहे. व्हायरल क्लिपमधील संभाषणामध्ये तात्या माने निवडणुकीतून माघार घ्या, असे सांगत आहेत.
या कथित क्लिपमध्ये तात्या माने हे आपल्याच पक्षाच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकत आहेत.
'पक्षाचा आदेश आहे, उमेदवारी मागे घ्या. तुम्ही वरुण सरदेसाई यांच्याशी बोलून घ्या', असे संभाषणही या क्लिपमध्ये आहे.
या क्लिपमधील पुढील संभाषण असे आहे की, "वरुन आदेश येतात, तेव्हा आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात. मी आता काय करू शकतो. पक्षाची वरच्या पातळीवर काय गणिते ठरतात, आपल्याला काय माहिती. मी काय करू शकतो", असेही तात्या माने वैशाली पोटे यांना सांगत आहेत.
जिल्हाप्रमुखाच्या भूमिकेवरच शंका
ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर कल्याण-डोंबिवलीमध्ये उद्धवसेनेत खळबळ उडाली आहे. पक्षाचे नेतेच पक्षविरोधी काम करत असल्याची चर्चाही या क्लिपनंतर सुरू झाली आहे. तात्या माने यांनी याबद्दल अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही. उद्धवसेनेच्या नेत्यांकडूनही यावर अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.
कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये भाजपा-शिंदेसेनेचे अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांच्या विजयाची घोषणा अद्याप झालेली नाही. अनेक प्रभागामध्ये विरोधी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने बिनविरोध निवडणूक झाली आहे. पण, २१ ठिकाणी बिनविरोध झाल्याने आरोप होत आहेत.