भाजपानं शिंदेसेनेला नाकारलं मात्र युती नसूनही प्रताप सरनाईकांच्या बॅनरनं अनेकांचं लक्ष वेधलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 21:29 IST2026-01-08T21:28:58+5:302026-01-08T21:29:43+5:30
मुंबई, ठाणे, वसई - विरार येथील महायुतीचे शिल्पकार म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांचा उल्लेख करून मीरा भाईंदर शहरात त्यांचे स्वागत असे नमूद केले आहे.

भाजपानं शिंदेसेनेला नाकारलं मात्र युती नसूनही प्रताप सरनाईकांच्या बॅनरनं अनेकांचं लक्ष वेधलं
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका निवडणूक प्रचारासाठी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपाची प्रचार सभा होणार आहे. मीरा भाईंदरमध्ये भाजपाने युती केली नसली तरी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्वागताचे मोठमोठे होर्डिंग शहरात लावले आहेत.
मीरा भाईंदरमध्ये भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांनी ९५ पैकी केवळ १३ जागा शिंदेसेनेला देऊ केल्या, भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना निवडून येऊ शकत नाही असं सांगत भाजपाने शिंदेसेनेशी युती मोडली. तेव्हापासून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक विरुद्ध नरेंद्र मेहता अशी खडाजंगी आणि गंभीर आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. शुक्रवारी सायंकाळी भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत. मुख्यमंत्री यांच्या स्वागतासाठी शिंदेसेनेचे मंत्री सरनाईक यांनी मोठे होर्डिंग लावले आहेत. गुरूवारी रात्रीपासून शहरातील प्रमुख मार्गावर होर्डिंग लावण्यास सुरुवात केली गेली. त्यावर मुंबई, ठाणे, वसई - विरार येथील महायुतीचे शिल्पकार म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांचा उल्लेख करून मीरा भाईंदर शहरात त्यांचे स्वागत असे नमूद केले आहे.
मुख्यमंत्री हे स्वतः मीरा भाईंदरमध्ये महायुती करण्यासाठी सकारात्मक होते. दोन वेळा आपले त्यांच्याशी बोलणे झाले होते. मात्र भाजपाला स्वतःची खाजगी मालमत्ता सारखे वापरणाऱ्या आ. मेहतांच्या घमेंडीने युती होऊ दिली नाही असा आरोप मंत्री सरनाईक यांनी केला. मीरारोड येथील मेट्रोचे काम मेहतांनी बंद पाडल्याचे देखील आपण मुख्यमंत्री यांच्याकडे सांगितले होते. मुख्यमंत्र्यांनी आपल्या समोर महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना काम करून घेण्यास सांगितले. मुख्यमंत्री यांनी सांगून देखील मेट्रोचे काम करून देण्यास विलंब केला. मेहतांमुळे मेट्रो आणि सूर्या पाणी योजना सुरु होण्यास उशीर झाला असा आरोपही सरनाईक यांनी केला आहे.