शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...; एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 00:39 IST2025-12-30T00:37:53+5:302025-12-30T00:39:30+5:30
TMC Election: ठाणे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात सोमवारी रात्री एबी फॉर्म वाटपाच्या वेळी मोठा गोंधळ निर्माण झाला.

शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...; एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
ठाणे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात सोमवारी रात्री एबी फॉर्म वाटपाच्या वेळी मोठा गोंधळ निर्माण झाला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांना एबी फॉर्म देण्याची प्रक्रिया सुरू असताना पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. सुरुवातीला शाब्दिक वाद झाला, मात्र काही वेळातच हा वाद तीव्र बनत शिवीगाळ, दमदाटी तसेच धक्काबुक्कीपर्यंत पोहोचला.
या घटनेची माहिती मिळताच ठाणे नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी काँग्रेस कार्यालयाच्या आत आणि बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून सतत नजर ठेवली जात आहे.
ठाणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण तसेच पक्षाचे इतर कमिटी निरीक्षक उमेदवारांना एबी फॉर्म वितरित करत होते. याच दरम्यान फॉर्म वाटपाबाबत काही कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांमध्ये असंतोष निर्माण झाला. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.