कुटुंब रंगलंय निवडणूक प्रचारात; शिंदेसेनेच्या उमेदवारांची घरच्यांसाठीच तिकीट घेण्यात आघाडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 14:15 IST2026-01-07T14:15:14+5:302026-01-07T14:15:59+5:30
अनेक दिग्गजांना पुन्हा संधी...

कुटुंब रंगलंय निवडणूक प्रचारात; शिंदेसेनेच्या उमेदवारांची घरच्यांसाठीच तिकीट घेण्यात आघाडी
ठाणे : ठाणे पालिका निवडणुकीत मागील काही निवडणुकांप्रमाणे यंदाही काही कुटुंबे निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत. त्यात काही संपूर्ण कुटुंबच, तर काही ठिकाणी पती, पत्नी, वडील आणि मुलगी, वहिनी, दीर, दोन भाऊ आणि पत्नी, आई आणि मुलगा असे काही दिग्गज चेहरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यातही शिंदेसेनेमधीलच अधिक उमेदवारांनी आपल्या घरच्यांना तिकीट मिळविण्यात आघाडी घेतली.
ठाण्यातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये देवराम भोईर यांच्यासह त्यांचा मुलगा संजय भोईर, सून उषा भोईर आणि दुसरी सून सपना भोईर हे कुटुंबीय शिंदेसेनेच्या तिकिटावर आपले नशीब आजमावत आहेत, तर पक्षाने तिकीट नाकारल्याने देवराम यांचा दुसरा मुलगा भूषण याने प्रभाग क्रमांक ३ मधून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. अशीच काहीशी परिस्थिती प्रभाग क्रमांक १ मध्ये असून त्याठिकाणी शिंदेसेनेकडून रवी घरत यांच्या पत्नी नम्रता घरत यांना उमेदवारी दिली; परंतु रवी यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.
वागळे पट्यात एकनाथ भोईर यांची पत्नी एकता भोईर, त्यांची सून यज्ञा भोईर, योगेश जानकर आणि त्यांच्या पत्नी दर्शना हेही शिंदेसेनेकडून उतरले आहेत. माजी आ. रवींद्र फाटक यांची पत्नी जयश्री फाटक व त्यांचे दीर राजेंद्र फाटक हे रिंगणात आहेत. दिव्यातून रमाकांत मढवी, त्यांची मुलगी साक्षी मढवी हे नशीब आजमावत आहेत.
हे आहेत उमेदवार -
शिंदेसेनेचे मिलिंद पाटील, त्यांच्या पत्नी मनाली पाटील, मंदार केणी हे शिंदेसेनेतून, तर त्यांच्या आई प्रमिला केणी या अपक्ष निवडणूक लढवित आहेत. मुंब्य्रात राष्ट्रवादी (अजित पवार) तून राजन किणे, त्यांच्या पत्नी अनिता व त्यांचा दीर मोरेश्वर किणे हे देखील निवडणुकीत उतरले आहेत.
याशिवाय राष्ट्रवादी (शरद पवार) चे अशरफ ऊर्फ शानू पठाण आणि त्यांची मुलगी मरझिया पठाण हे देखील निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत. भाजपकडून कृष्णा पाटील
आणि नंदा पाटील हे दाम्पत्य पुन्हा एकदा निवडणूक लढवित आहेत.
एकाच कुटुंबातील सात जण परस्परांच्या विरोधात
प्रभाग क्र.१९ व २० मधून पाटील कुटुंबातील सात उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहे. विजय पाटील, युवराज पाटील हे बाप-लेक आहेत, तर मीनाक्षी पाटील या विजय पाटील यांच्या लहान भावाच्या पत्नी आहेत. दुसरीकडे प्रधान पाटील, ललिता पाटील, कुमार पाटील व माजी महापौर अपेक्षा पाटील हे एकाच घरातील आहेत.
उल्हासनगरात लुंड, बोडारे, भुल्लर, वधारिया, छाप्रू, चौधरी, बागुल, टाले, अशान, राजवानी या घरातील प्रत्येकी दोन-तीन उमेदवार महापालिका निवडणूक रिंगणात उतरल्याने घराणेशाहीचा आरोप होत आहे.
शिंदेसेनेचे बहुतांश उमेदवार कोट्यधीश -
६४९ उमेदवारांपैकी ११४ उमेदवार ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत कोट्यधीश आहेत. यात शिंदेसेनेतील बहुसंख्य उमेदवारांचा समावेश आहे.
पाटील, काटेकर, चौधरी कुटुंब आहेत निवडणूक रिंगणात
भिवंडी : पालिका निवडणुकीसाठी अनेक पक्ष संघटना व अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. आतापर्यंत कायम अस्तित्व असलेल्या पाटील, काटेकर, चौधरी परिवारातील दोन ते
तीन सदस्य यावेळीही निवडणूक रिंगणात आहेत.
पालिकेत अनेक वर्षांपासून सत्तेत असलेल्या कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील हे प्रभाग १-ड मधून निवडणूक लढवत असून, त्यांचा मुलगा मयुरेश विलास पाटील हे प्रभाग १-क मधून निवडणूक लढवत आहेत, तर त्यांची पत्नी माजी महापौर प्रतिभा पाटील या प्रभाग १-ब मधून रिंगणात आहेत.
टेमघर येथील शिंदेसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक बाळाराम चौधरी हे प्रभाग १३-ड मधून निवडणूक लढवत असून, त्यांचा मुलगा रोहित पाटील प्रभाग १५-क मधून शिंदेसेनेतून निवडणूक लढवत आहे. ताडाळी येथील भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नीलेश चौधरी २३-ड मधून निवडणूक लढत असून त्यांची पत्नी दक्षता चौधरी २१-ब मधून जय हिंद सेनेकडून निवडणूक लढवत आहेत.
कामतघर येथील शिंदेसेनेचे माजी उपमहापौर मनोज काटेकर हे स्वतः व त्यांची पत्नी व मुलगा, असे तिघेही निवडणूक रिंगणात आहेत. काटेकर हे प्रभाग २१-ड मधून तर त्यांची पत्नी वंदना या प्रभाग २१-ब मधून शिंदेसेनेतून निवडणूक लढवत आहेत. तर त्यांचा मुलगा २३-ड मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहे.