शिंदे यांच्या युतीच्या घोषणेने त्यांचेच सैनिक अस्वस्थ; भिवंडीचे चित्र : अगोदर दिले होते स्वबळाचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 09:55 IST2025-12-24T09:54:40+5:302025-12-24T09:55:09+5:30
मागील महापालिका निवडणुकीत भाजपचे १९ तर शिवसेनेचे १२ नगरसेवक निवडून आले. भाजप-शिंदेसेनेच्या युतीबाबत स्पष्टता नसल्याने भाजप आणि शिंदेसेनेच्या स्थानिक नेत्यांनी स्वबळावर लढण्याची तयारी केली.

शिंदे यांच्या युतीच्या घोषणेने त्यांचेच सैनिक अस्वस्थ; भिवंडीचे चित्र : अगोदर दिले होते स्वबळाचे संकेत
- नितीन पंडित
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : महापालिका निवडणुकीतील भाजप-शिंदेसेनेच्या युतीबद्दल कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम असतानाच निवडणुकीत विजयाची हंडी महायुती फोडेल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्याने भाजपचे कार्यकर्ते अवाक् झाले. त्यांनी शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मात्र त्यांच्या या विधानामुळे कार्यकर्त्यांमध्येही कमालीची अस्वस्थता पसरली आहे.
मागील महापालिका निवडणुकीत भाजपचे १९ तर शिवसेनेचे १२ नगरसेवक निवडून आले. भाजप-शिंदेसेनेच्या युतीबाबत स्पष्टता नसल्याने भाजप आणि शिंदेसेनेच्या स्थानिक नेत्यांनी स्वबळावर लढण्याची तयारी केली. शिंदेसेनेतील अनेक इच्छुकांनी प्रभागात मतपेरणी केली.
भाजपच्या १३६ उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या असून, सर्वच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शहरात पोषक वातावरण असून, ४९ जागा आम्ही ताकदीनिशी लढू व महापौर आमचाच होईल यात शंका नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे निवडणूक प्रचार यंत्रणा प्रमुख ॲड. प्रेषित जयवंत
यांनी दिली.
आमची मेहनत वाया जाणार
शिंदेंच्या सोमवारच्या विधानाने शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पाहायला मिळाली. युती होणार नाही म्हणून मागील तीन-चार महिन्यांपासून आम्ही तयारी केली होती. मात्र, आता युती झाली तर आम्ही तयारी केलेल्या जागा भाजपच्या वाट्याला जाणार असल्याने आमची मेहनत वाया जाणार. आम्ही पाहिलेले स्वप्न भंगणार, अशी माहिती शिंदेसेनेच्या एका इच्छुकाने नाव न छापण्याच्या
अटीवर दिली.