पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकण्याची स्पर्धा; राज यांनी पाच हजारांना मत विकणाऱ्यांचे कान टोचले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 06:01 IST2026-01-13T06:01:02+5:302026-01-13T06:01:28+5:30
आपले मत विकणारे हे आई-वडील आपल्या मुलांना काय उत्तर देतील

पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकण्याची स्पर्धा; राज यांनी पाच हजारांना मत विकणाऱ्यांचे कान टोचले
ठाणे : कल्याण डोंबिवलीमधील शैलेश धात्रक, मनीषा धात्रक यांना १५ कोटींची ऑफर दिली गेली. ठाण्यात राजेश्री नाईक यांना पाच कोटींची, तर सुशील आवटे यांना एक कोटींची ऑफर दिली होती. मात्र त्यांनी ती नाकारली आणि ते स्वाभिमाने निवडणूक लढवत आहेत. मात्र काही मतदार पाच-पाच हजारांना मत विकत आहेत. आपले मत विकणारे हे आई-वडील आपल्या मुलांना काय उत्तर देतील, असा रोखठोक व भावनिक सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी केला. ठाणे हे मराठी अस्मितेचा, स्वाभिमानाचा आणि संघर्षाचा इतिहास असलेले शहर आहे. ठाण्यासह आजूबाजूच्या शहरांच्या अस्तित्वावर घाला घालण्याचे कारस्थान सुरू असताना स्वस्थ बसू नका, असे आवाहन राज यांनी केले.
ठाणे महापालिका निवडणुकीकरिता उद्धवसेना, मनसे व राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराकरिता गडकरी रंगायतनशेजारील चौकात आयोजित सभेत राज बोलत होते. पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकण्याची स्पर्धा लागली आहे. भाजपवाले मतांसाठी पैसे वाटत आहेत आणि शिंदेचे लोक त्यांना पकडतात हे या सरकारमध्ये काय सुरू आहे? एवढा पैसा यांच्याकडून कुठून आला? "जर यांनी विकास केला असेल तर पैसे वाटण्याची गरज यांना का भासते?" असा प्रश्न राज यांनी केला.
कल्याण-डोंबिवलीत पैशांच्या जोरावर उमेदवारी मागे घ्यायला लावली, असा आरोप करून राज यांनी तिकडे गुलामांचा बाजार भरला असल्याचा टोला लगावला. पैशांची ऑफर नाकारणाऱ्या राजेश्री नाईक व सुशील आवटे यांना राज यांनी व्यासपीठावर बोलावून सन्मान केला. तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. एकाच मोठ्या उद्योगपतीला विमानतळ, बंदरे, वीज यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर मक्तेदारी निर्माण करू दिली आहे. मी उद्योगपतींच्या विरोधात नाही, पण एकाच व्यक्तीवर एवढी मेहरबानी का?" सारी व्यवस्था ठप्प करण्याची क्षमता ही एका उद्योगपतीच्या हाती एकवटल्याची भीती राज यांनी व्यक्त केली.
बदलापूर प्रकरणातील आरोपीला का मारले?
बदलापूर प्रकरणातील आरोपीला एन्काउंटरमध्ये मारले, तो काही गुपित उघड करणार होता का? असा सवाल उपस्थित करत राज यांनी सहआरोपी आपटे याला स्वीकृत नगरसेवकपद देण्याची हिंमत भाजपला का होते, कारण तुम्हाला पाच हजार फेकून विकत घेता येते, अशी बोचरी टीका केली.