मीरा भाईंदरच्या नागरिकांनी गुन्हे दाखल असलेल्या ४९ जणांच्या माथी लावला विजयाचा टिळा; भाजपाच्या नगरसेवकांची संख्या सर्वाधिक
By धीरज परब | Updated: January 19, 2026 10:30 IST2026-01-19T10:29:31+5:302026-01-19T10:30:42+5:30
Mira Bhayander Municipal Corporation Election: मीरा भाईंदर महापालिकेत भाजपाने ८७ पैकी तब्बल ४७ उमेदवार गुन्हे दाखल असलेले दिले होते. त्यातील गुन्हे दाखल असलेले तब्बल ४६ जण हे नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. तर गुन्हा दाखल असलेल्यात काँग्रेस, शिंदेसेना व अपक्ष यांचा प्रत्येकी १ निवडून आले आहेत.

मीरा भाईंदरच्या नागरिकांनी गुन्हे दाखल असलेल्या ४९ जणांच्या माथी लावला विजयाचा टिळा; भाजपाच्या नगरसेवकांची संख्या सर्वाधिक
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेत भाजपाने ८७ पैकी तब्बल ४७ उमेदवार गुन्हे दाखल असलेले दिले होते. त्यातील गुन्हे दाखल असलेले तब्बल ४६ जण हे नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. तर गुन्हा दाखल असलेल्यात काँग्रेस, शिंदेसेना व अपक्ष यांचा प्रत्येकी १ निवडून आले आहेत. ह्यात १ पासून १० गुन्हे असलेले नगरसेवक असून यंदाच्या पालिका सभागृहात दाखलेबाजांची आणि गुंड प्रवृत्तीची भूमिका शहराला आणखी काळोखेल का सुधरेल ? हे लवकरच दिसून येणार आहे. ह्यात किरकोळ, राजकीय गुन्हे पासून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेले नगरसेवक आहेत.
जागरूक समजली जाणारी जनता गुन्हे दाखल असलेले, संपत्ती झपाट्याने वाढलेले राजकारणी यांना निवडून देत असल्याने स्वच्छ कार्यकर्ते निवडून येणे अवघड झाल्याचे यंदाच्या मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा स्पष्ट झाले. ह्या आधी देखील राजकीय व किरकोळ गुन्हे पासून हिस्ट्री शीटर दाखलेबाज ना निवडणुकीत लोकांनी निवडून दिले आहे.
भाजपाने ८७ पैकी तब्बल ४७ उमेदवार
हे गुन्हे दाखल असलेले दिले होते. शिंदेसेनेने ८१ पैकी १२ तर काँग्रेसने ३१ पैकी ४ उमेदवार हे गुन्हे दाखल असलेले उतरवले होते. निवडणुकीच्या निकालात गुन्हे दाखल असलेल्यात भाजपचे तब्बल ४६ नगरसेवक निवडून आले आहेत. म्हणजेच भाजपाच्या ७८ नगरसेवकां पैकी तब्बल ४६ जणांवर गुन्हे दाखल आहेत. निवडून आलेल्या काँग्रेसच्या १३ पैकी एकावर, शिंदेसेनेच्या ३ पैकी एकावर तर एका अपक्ष वर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे लोकांनीच उमेदवारांची गुन्हेगारी व वाढत्या संपत्तीची पार्श्वभूमी न पाहता इतकेच काय तर उमेदवार परिसरात कार्य करत होते का? हे देखील न पाहता नगरसेवक निवडून दिल्याने समाज व शहराचे काय भले होणार? असा प्रश्न अनेक जागरूक नागरिक करत आहेत.
सर्वात जास्त १० गुन्हे दाखल असलेले व सर्वात जास्त झपाट्याने संपत्ती वाढलेले भाजपाचे दिनेश जैन हे प्रभाग २० मधून निवडून आले आहेत. भाजपाचे ९ गुन्हे दाखल असलेले मनोज दुबे हे प्रभाग २१ मधून जिंकले. लाच सह ८ गुन्हे असलेले व संपत्ती कित्येक पटीने वाढलेले अशोक तिवारी प्रभाग १ मधून जिंकले आहेत. तर ६ गुन्हे - केस दाखल असलेले भाजपाचे हसमुख गेहलोत, ध्रुवकिशोर पाटील, अनिल विराणी, दीप्ती भट, अनिता पाटील देखील निवडून आले.
भाजपचे प्रत्येकी १ गुन्हा - केस असलेले नवीन सिंग, जयेश भोईर, संजय थरथरे, सुरेश खंडेलवाल, श्रद्धा कांबळी, ऍड. मयुरी म्हात्रे, प्रेमनाथ पाटील व कुसुम गुप्ता जिंकले आहेत. भाजपच्या २ गुन्हा - केस असलेल्यात ऍड तरुण शर्मा, मुन्ना उर्फ श्रीप्रकाश सिंह, ऍड रवी व्यास, राकेश शाह, वंदना पाटील, नीला सोन्स, तुषार पारधी, स्नेहा पांडे यांचा विजय झाला आहे.
भाजपाच्या ३ गुन्हे-दावे दाखल असलेल्या निर्वाचित नगरसेवकां मध्ये वंदना भावसार, माजी महापौर ज्योत्स्ना हसनाळे, संजय थेराडे , भगवती शर्मा, सुनीता जैन, दरोगा उर्फ पंकज पांडेय, दीपिका अरोरा यांचा समावेश आहे. प्रत्येकी ४ गुन्हे - केस असलेले भाजपाचे ७ जण नगरसेवक झाले आहेत. त्यात वर्षा भानुशाली, सीमा शाह, हेतल परमार, मोहन म्हात्रे, सुरेखा सोनार, रुपाली शिंदे व महेश म्हात्रे यांचा समावेश आहे. वर्षा भानुशाली यांना तर भ्रष्टाचार प्रकरणी न्यायालयाने ५ वर्ष कारावास आणि ५ लाखांचा दंड अशी शिक्षा देखील ठोठावलेली आहे.
भाजपचे प्रत्येकी ५ गुन्हे - केस असलेले ६ जणांना लोकांनी निवडून दिले आहे. त्या मध्ये बलात्कार सह अन्य गुन्हे असलेले प्रशांत दळवी, डिम्पल मेहता, नयना म्हात्रे, आनंद मांजरेकर, विशाल पाटील, वेश्या व्यवसाय प्रकरणी गुन्हा असलेले गणेश शेट्टी यांचा समावेश आहे. हे सर्व नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. भाजपचे रजनीकांत मयेकर यांच्यावर १० दावे असून मालमत्ताचे जास्त आहेत. भाजपच्या बहुतांश नगरसेवकांवर फसवणूक, गुन्हेगारी कट रचणे, विश्वासघात पासून मारहाण, भ्रष्टाचार आदी विविध स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
भाजपाचे बंडखोर आणि अपक्ष म्हणून जिंकलेल्या अनिल भोसले यांच्यावर ३ गुन्हे आहेत. तर निवडून आलेल्या शिंदेसेनेच्या शर्मिला बगाजी वर १ आणि काँग्रेसच्या जय ठाकूर वर १ गुन्हा आहे.