Brutal Strongroom Outside the Car, Home Alone, Brutal Opened by Youth Congress Awareness, Inspection by Officers | भिवंडीत स्ट्राँगरूमबाहेर कारमध्येच होमहवन, युवक काँग्रेसच्या जागरूकतेमुळे पितळ उघडे, अधिकाऱ्यांकडून पाहणी

भिवंडीत स्ट्राँगरूमबाहेर कारमध्येच होमहवन, युवक काँग्रेसच्या जागरूकतेमुळे पितळ उघडे, अधिकाऱ्यांकडून पाहणी

भिवंडी : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर मतदान यंत्रे ठेवलेल्या स्ट्राँगरूमच्या सुरक्षेबाबत काँग्रेसकडून आक्षेप घेतले जात असतानाच, भिवंडी लोकसभा मतदारसंघात एलकुंदे गावातील प्रेसिडेन्सी शाळेत मतमोजणीच्या ठिकाणी बनवलेल्या स्ट्राँगरूमबाहेर सोमवारी काहीजण कारमध्ये होमहवन करताना आढळल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांचे पितळ उघडे पाडले.

भिवंडी लोकसभेसाठी २९ एप्रिल रोजी मतदान पार पडले. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी व सहा विधानसभा क्षेत्रांच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाºयांनी सोनाळे ग्रामपंचायत हद्दीतील एलकुंदे येथील प्रेसिडेन्सी स्कूलमध्ये बनवलेल्या स्ट्राँगरूममध्ये सर्व ईव्हीएम सुरक्षित ठेवल्या. या ईव्हीएमच्या संरक्षणासाठी केंद्रीय राखीव पोलीस, राज्य राखीव पोलीस आणि स्थानिक पोलीस असा त्रिस्तरीय जागता पहारा ठेवण्यात आला आहे. तेथील सीसीटीव्हीवर नजर ठेवण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारानेदेखील आपले कार्यकर्ते पहारेकरी म्हणून बसविले आहेत. याच शाळेच्या दुसºया इमारतीमध्ये शाळा व्यवस्थापनाचे कार्यालय आहे. त्या ठिकाणी जाण्यास कोणासही मज्जाव नाही. शाळेच्या कामानिमीत्ताने लोकांचे येथे मुक्त जाणेयेणे आहे. सोमवारी सायंकाळी शाळेचे चेअरमन महावीर जैन यांना भेटण्यासाठी आलेले श्रीकांत पंदिरे व त्यांचे दोन साथीदार गेटमधून बाहेर पडल्यानंतर काही अंतरावर असलेल्या कारमध्येच होमहवनास सुरूवात केली. याची माहिती काँग्रेस कार्यकर्त्यांकडून युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विजय पाटील यांना समजली. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेतली.

बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांकडे त्यांनी तक्रार केली असता, पोलिसांनी कारची तपासणी केली. त्यावेळी कारच्या मागील बाजूस होमहवनाची सामुग्री आढळून आली. त्यानंतर काँग्रेस उमेदवार सुरेश टावरे यांनीसुद्धा त्या ठिकाणी येऊन, तुम्हाला होमहवन करण्यासाठी हीच जागा मिळाली का, असा प्रश्न त्यांना केला. कार मालक श्रीकांत पंदिरे यांनी आपण गोदाम खरेदीच्या चर्चेसाठी महावीर जैन यांच्याकडे आलो असता, माघारी जाताना सूर्यास्ताची वेळ झाल्याने कारमध्येच होमहवन केले. त्यामागे आपला कोणताही दुसरा हेतू नसल्याचे स्पष्ट करून त्यांनी विनवणी केली असता, त्यांना सोडून देण्यात आले.
स्ट्राँगरूमचा परिसर निवडणूक यंत्रणेने ताब्यात घेतला असताना शाळेच्या इमारतीसाठी वेगळा न्याय का, असा सवाल उपस्थित करीत पोलिसांनी संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. शाळेच्या कार्यालयात बसून आपले व्यवहार करण्यासाठी जाणाºयांनादेखील पायबंद घातला पाहिजे, अशी मागणी युवक काँग्रेसचे विजय पाटील यांनी केली आहे.

शंभर मीटर परिसरात लावले सीसी कॅमेरे

या घटनेच्या पार्श्वभूमिवर भिवंडी लोकसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी किसन जावळे, उपविभागीय अधिकारी मोहन नळदकर, तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय हजारे यांनी मंगळवारी दुपारी स्ट्राँगरूम परिसरास तातडीने भेट दिली. या पथकाने परिसराची पाहणी करून तेथील ईव्हीएमच्या सुरक्षा यंत्रणेचा आढावाही घेतला.

यावेळी पत्रकारांशी बोलताना किसन जावळे यांनी होम हवनाचा प्रकार हा स्ट्राँगरूमपासून काही अंतरावरच झाल्याने गैरसमज निर्माण झाला होता. त्याबाबत शंका निरसन झाले आहे. स्ट्राँगरूम त्रिस्तरीय सुरक्षा कवच असून शंभर मीटर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. त्याद्वारे स्ट्राँँगरूमच्या ठिकाणी कडक पहारा आहे.

दरम्यान, प्रेसिडेन्सी स्कूल व्यवस्थापनाने कार्यालयातील नियमीत कामकाजासाठी कर्मचारी शाळेत येणे आवश्यक आहेत, असे सांगितले. त्यावरून माळी, कामगार, शिपाई व कार्यालयीन कर्मचाºयांची नावे मागवण्यात आली असून त्यांच्या प्रवेशपत्राबाबत जिल्हाधिकाºयांकडे शिफारसही करण्यात आली आहे. त्यावर जिल्हाधिकारी निर्णय घेणार असल्याचे जावळे यांनी सांगितले.

Web Title:  Brutal Strongroom Outside the Car, Home Alone, Brutal Opened by Youth Congress Awareness, Inspection by Officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.