केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 07:19 IST2025-12-28T07:19:15+5:302025-12-28T07:19:31+5:30
मात्र, तीन ते चार प्रभागांवरून म्हणजेच १२ जागांवरून शिंदेसेना आणि भाजपमध्ये मतभेद कायम आहेत.

केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
ठाणे : महाराष्ट्रातील आगामी महापालिका निवडणुका युतीच्या माध्यमातूनच लढविण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर ठाण्यात शनिवारी तीन तास महायुतीची तिसरी महत्त्वाची बैठक पार पडली. मात्र, तीन ते चार प्रभागांवरून म्हणजेच १२ जागांवरून शिंदेसेना आणि भाजपमध्ये मतभेद कायम आहेत.
या प्रलंबित जागांबाबत लवकरच वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत स्वतंत्र बैठक घेण्यात येणार असून, त्यातून अंतिम तोडगा निघेल, असा विश्वास शिंदेसेनेचे खा. नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला. रविवारपर्यंत जागावाटपाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. शनिवारी ठाण्यातील वर्तकनगर येथील विभागीय कार्यालयात महायुतीची जागावाटपाची बैठक झाली. या बैठकीनंतर म्हस्के यांनी सांगितले की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर महापालिका निवडणुकाही युतीच्या माध्यमातूनच लढविण्यात येणार आहेत. महायुतीची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल आणि उमेदवारांपर्यंत युतीचा संदेश पोहोचविण्यात येईल.
दरम्यान, महायुतीची पहिली बैठक होण्यापूर्वी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपसोबत युती न करण्याची भूमिका जाहीर केली होती.
यावर प्रतिक्रिया देताना म्हस्के म्हणाले की, आनंद परांजपे यांना ही बाब माहिती नसल्यामुळेच कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीच्या बैठकीस आमंत्रण देण्यात आले नसावे. उद्धवसेनेचे खा. संजय राऊत यांच्यावरही त्यांनी टीका केली. ज्यांना उमेदवार शोधण्यासाठी नाशिक आणि पुण्यात फिरावे लागत आहे, त्यांनी आधी आपला पक्ष सांभाळावा आणि नंतर महायुतीवर टीका करावी, असा टोला म्हस्के यांनी लगावला.
मीनाक्षी शिंदे बैठकीला हजर
गुरुवारी ठाणे महिला जिल्हा संघटकपदाचा राजीनामा देणाऱ्या मीनाक्षी शिंदे शनिवारी झालेल्या नेत्यांच्या जागावाटपाच्या बैठकीला उपस्थित होत्या. यावेळी मीनाक्षी शिंदे यांना त्यांच्या राजीनाम्याबाबत विचारले असता आधी युतीच्या जागा वाटपाचा निर्णय होईल. मग माझ्या राजीनाम्याच्या बाबतीतही निर्णय घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
संजय केळकर अनुपस्थित
युतीचा निर्णय शनिवारपर्यंत झाला नाही तर स्वबळावर निवडणूक लढवू, असा अल्टिमेटम देणारे भाजप आ. संजय केळकर शनिवारच्या बैठकीला गैरहजर राहिल्याने चर्चांना उधाण आले होते.
तीन प्रभागांमध्ये ताळमेळ बसत नाही. पुढील २४ तासांत त्यातून मार्ग काढला जाईल आणि युतीच्या माध्यमातून निवडणुका लढविल्या जातील. दोन्ही बाजूने निर्णय घेण्यासाठी वरिष्ठ नेत्यांकडे विषय सोपविला आहे. काही तासांतच याबाबत निर्णय घेऊन युती जाहीर होईल.
निरंजन डावखरे, प्रभारी, ठाणे, भाजप