भाजप १० जागा कमी घेण्यास तयार? पहाटेपर्यंत चर्चा; ५५ जागा मागणारे भाजप नेते आले ४५ जागांवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 08:36 IST2025-12-25T08:36:22+5:302025-12-25T08:36:55+5:30
ठाणे, कल्याण डोंबिवलीसह मुंबई महानगर क्षेत्रातील पालिकांमधील शिंदेसेना आणि भाजप युती अंतिम टप्प्यात आल्याचे सांगण्यात आले.

भाजप १० जागा कमी घेण्यास तयार? पहाटेपर्यंत चर्चा; ५५ जागा मागणारे भाजप नेते आले ४५ जागांवर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : भाजपने केलेल्या जागांच्या मागणीमुळे गेले दोन दिवस बंद पडलेली युतीच्या चर्चेला मंगळवारी रात्रीचा मुहूर्त लाभला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, सरचिटणीस राहुल शेवाळे यांच्यात शिंदे यांच्या ठाण्यातील ‘शुभदीप’ निवासस्थानी पहाटे चार वाजेपर्यंत म्हणजेच तब्बल पाच तास चर्चा झाली. ठाण्यात ५५ जागांकरिता अडून बसलेले भाजपचे नेते ४५ जागा स्वीकारण्यास तयार झाल्याचे संकेत मिळाले. चर्चेअंती ठाणे, कल्याण डोंबिवलीसह मुंबई महानगर क्षेत्रातील पालिकांमधील शिंदेसेना आणि भाजप युती अंतिम टप्प्यात आल्याचे सांगण्यात आले.
येत्या दोन दिवसांत स्थानिक पातळीवर प्रभाग स्तरावरील उमेदवारांची चर्चा होणार आहे. ठाण्यात शिंदेसेना ८१, भाजप ४५ आणि मित्र पक्ष असलेल्या आनंदराज आंबेडकर आणि रामदास आठवले यांच्या पक्षांना पाच जागा दिल्या जातील, अशी चर्चा झाल्याची माहिती आहे.
वरिष्ठ पातळीवर महायुती घोषित झाली. ठाण्यात दोन बैठकांनंतर शिंदेसेनेकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने भाजपने स्वबळाची चाचपणी सुरू केली होती. शिंदेसेनेनीदेखील १३१ जागांसाठी मुलाखती सुरू केल्या होत्या. कल्याण डोंबिवली व नवी मुंबईत युतीबाबत संभ्रम निर्माण झाला होता. पहाटे चार वाजेपर्यंत झालेल्या चर्चेअंती संभ्रम दूर झाला व जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्याच्या दिशेने पाऊल टाकले गेले.
भाजपकडे २४ नगरसेवकांचे संख्याबळ
ठाण्यात भाजपने ५५ जागांची अपेक्षा केली होती. त्यांनी शिंदेसेनेतील काही जागांवरदेखील दावा केला होता. अखेर भाजपच्या वाटेला ४५ जागा जातील, असे संकेत आता या बैठकीतून देण्यात आले. भाजपकडे २४ नगरसेवकांचे संख्याबळ आहे. त्यांना २१ जागा वाढीव मिळणार असल्याचे चित्र दिसत आहे.