ठाण्यात शिंदेसेनेपुढे भाजपने नांगी टाकली? शिंदेसेना ८१ ऐवजी ९१ जागा लढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 10:41 IST2025-12-29T10:41:34+5:302025-12-29T10:41:57+5:30
भाजपने शिंदेसेनेच्या सात ते आठ जागांवर दावा केला. शिंदेसेनेने त्याठिकाणी उमेदवार हे कमळावर लढतील असे सांगत जागा न सोडण्याचे संकेत दिले.

ठाण्यात शिंदेसेनेपुढे भाजपने नांगी टाकली? शिंदेसेना ८१ ऐवजी ९१ जागा लढणार
ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्यात फारसे न दुखावण्याची भूमिका भाजप नेतृत्वाने घेतली असून ५५ जागांची मागणी करणाऱ्या भाजपची ४० जागांवर बोळवण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिंदेसेना ९१ जागांवर लढणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे मित्र पक्षाच्या वाटेला एकही जागा नसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
भाजपने ५५ जागांवर दावा केला होता. मात्र, ताे ४५ पर्यंत आला. भाजपने शिंदेसेनेच्या सात ते आठ जागांवर दावा केला. शिंदेसेनेने त्याठिकाणी उमेदवार हे कमळावर लढतील असे सांगत जागा न सोडण्याचे संकेत दिले.
चार जागांवर अद्यापही वाद
जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असला तरी चार जागांवर अद्याप एकमत झालेले नाही. परंतु त्यावर सोमवारी निर्णय होईल अशी माहिती सूत्रांनी दिली. उमेदवारी अर्ज भरण्याची मंगळवारी शेवटची तारीख असल्याने रविवारी, सोमवारी दोन्ही पक्षांकडून ए-बी फॉर्मचे वाटप केले जाणार आहे.
शिंदेसेना ८१ ऐवजी ९१ जागा लढणार
शनिवारी तीन तास दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये मॅरेथॉन बैठक झाली. या बैठकीत १२ जागांवर घोडे अडले होते, अखेर आता वरिष्ठ पातळीवर जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नव्या समीकरणात मित्र पक्ष रिपाइं किंवा आनंदराज आंबेडकर गटाला कुठेही स्थान देण्यात आलेले नाही. शिंदेसेनेने ८१ ऐवजी ९१ जागा लढविण्यावर एकमत झाले असून भाजपच्या जागा ५५ वरून ४० वर आल्या आहेत. भाजपला हा मोठा फटका मानला जात आहे.