मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...

By अजित मांडके | Updated: December 24, 2025 07:45 IST2025-12-24T07:45:02+5:302025-12-24T07:45:21+5:30

Thane Election Politics: भाजप अधिक आक्रमक : महाविकास आघाडीतील पक्षांना करावी लागेल तडजोड, स्वब‌ळावर धावायची सोडा चालायचीही त्यांच्यात दिसत नाही ताकद, राज्यात तीन वर्षांपूर्वी झालेल्या सत्तांतराचा ठाणे ठरला केंद्रबिंदू 

Big game plan! BJP pushes Shinde Shiv Sena's nose in Thane; To avoid asking for more seats in Mumbai... | मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...

मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...

- अजित मांडके
लोकमत न्यूज नेटवर्क  
ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजण्याच्या आधीच महायुतीची घोषणा झाली. परंतु, त्याचे पडसाद आता ठाण्यात उमटले आहेत. भाजपमध्ये अनेक नाराजांनी थेट काम न करण्याचा इशारा देत युती तोडण्याची भूमिका घेतली. शिंदेसेनेतही काही नाराज असले, तरी ते आपली नाराजी जाहीर करीत नाहीत. मुंबईत शिंदेसेनेने जास्त जागांवर दावा करू नये, याकरिता युतीला विरोध करून शिंदेसेनेचे नाक दाबण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे. महाविकास आघाडीतील पक्ष एकमेकांना धरून आहेत. कारण, त्यांची ताकद बरीच क्षीण झाली असून, स्वबळावर धावायची सोडा चालायचीही ताकद दिसत नाही.
राज्यात तीन वर्षांपूर्वी झालेल्या सत्तांतराचा ठाणे हा केंद्रबिंदू ठरला. त्यामुळेच ठाणे महापालिका निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाणे नाक मानले जात आहे. आपला गड ताब्यात ठेवण्यासाठी शिंदेसेना सज्ज झाली आहे. 

ठाणे महापालिकेची मुदत ५ मार्च २०२२ रोजी सुंपष्टात आली. तेव्हापासून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न्यायप्रविष्ट होत्या. त्यामुळे महापालिकेवर मागील तीन वर्षे प्रशासकीय राजवट होती. परंतु आता निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्याने प्रशासकीय राजवटही संपुष्टात 
येणार आहे.

आता काय आहेत राजकीय समीकरणे? 
सध्या ठाण्यात शिंदेसेनेचा वरचष्मा दिसत आहे. शिंदेसेनेकडे ७९, भाजपकडे २४, उद्धवसेनेकडे ०३, कॉंग्रेसकडे ०३, मनसे ०, राष्ट्रवादी (शरद पवार) १३ आणि राष्ट्रवादी (अजित पवार) ११ चे संख्याबळ आहे. त्यामुळे २०१७ च्या तुलनेत यंदा राजकीय समीकरणे ही बदललेली दिसत आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळे ठाण्यातील समीकरणे बदलतील का, यादृष्टीने चाचपणी सुरू झाली आहे. तर राष्ट्रवादीने (शरद पवार) कळवा, मुंब्रा येथे अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. तर काँग्रेसलाही मुंब्रा येथे उमेदवारी हवी असल्याने त्यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे.

कोणते मुद्दे ठरतील निर्णायक? 
शहरातील पाणी समस्या सुटू शकलेली नाही, धरणात पुरेसे पाणी असूनही ठाणेकरांना आजही टँकरवर अवलंबून राहावे लागते. खास करून घोडबंदर रोड परिसरातील सोसाट्यांना टँकरचा भूर्दंड सहन करावा लागत आहे.
ठाणे शहरात  वाहतूककोंडी ही पाचवीलाच पूजल्याचे चित्र आहे. शहरात एकही दिवस असा गेला नाही की वाहतूककोंडी झाली नाही. या वाहतूक कोंडीने ठाणेकर त्रासून गेले आहेत. हा मुद्दा प्रचारात केंद्रस्थानी असेल. तसेच शहरात कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. सत्ताधाऱ्यांकडून क्लस्टरचा गाजावाजा केला जात असताना, त्या आघाडीवर फारसे काही न झाल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. निवडणुकीत हा मुद्दाही गाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वाढलेल्या मतदारसंख्येचा लाभ कुणाला हाेणार?  
२०१७ मधील महपालिका निवडणुकीत १२ लाख २८ हजार ६०६ मतदार होते. आता मतदारांच्या संख्येत ४ लाखांची वाढ झाली आहे. आता मतदारांची संख्या १६,४९,८६७ एवढी झाली आहे. त्यामुळे वाढलेल्या चार लाख मतदारांचा लाभ कोणाला होणार हे पाहणे महत्वाचे आहे. या मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी शिंदेसेना व भाजपमध्ये सध्या जोरदार प्रयत्न सुरु आहेत. यात काेण यशस्वी हाेते हे १६ जानेवारीला निकालानंतर हे स्पष्ट होईल.
 

Web Title : बड़ा गेम प्लान: भाजपा ने ठाणे में शिंदे सेना को दबाया!

Web Summary : भाजपा ने ठाणे में शिंदे सेना पर रणनीतिक दबाव डाला, ताकि मुंबई में उनकी सीट की मांग सीमित हो। आगामी चुनावों में मतदाताओं में वृद्धि के साथ, ठाणे पानी की कमी और यातायात जैसी समस्याओं का सामना कर रहा है।

Web Title : Big Game Plan: BJP Suppresses Shinde Sena in Thane!

Web Summary : BJP strategically pressures Shinde Sena in Thane, aiming to limit their Mumbai seat demands. With increased voters, Thane faces key issues like water scarcity and traffic congestion ahead of upcoming elections.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.