काँग्रेस-राष्ट्रवादीमधील वादाचा बाबाजी पाटील यांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 12:10 AM2019-05-27T00:10:48+5:302019-05-27T00:11:16+5:30

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना अपेक्षित यश मिळाले आहे.

Babaji Patil's fight against Congress-NCP fight | काँग्रेस-राष्ट्रवादीमधील वादाचा बाबाजी पाटील यांना फटका

काँग्रेस-राष्ट्रवादीमधील वादाचा बाबाजी पाटील यांना फटका

googlenewsNext

- पंकज पाटील
अंबरनाथ : अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना अपेक्षित यश मिळाले आहे. मात्र, लाखभर मते घेण्याचे ध्येय मात्र काही मतांनी हुकले. शिंदे यांना शिवसेनेच्या संघटनात्मक कौशल्याचा जसा फायदा झाला, तसाच फायदा हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात निर्माण झालेल्या दरीचाही झाला. निवडणुकीच्या दिवसापर्यंत या दोन पक्षांत एकवाक्यता नसल्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे आपापल्यापरीने स्वतंत्र काम करत होते. त्यातच, राष्ट्रवादी पालिकेत सेनेसोबत सत्तेत असल्याने त्यांच्यावर पालकमंत्र्यांचाही अप्रत्यक्ष दबाव होता. त्यामुळे इच्छा असतानाही पूर्ण ताकदीने राष्ट्रवादीला लढता आलेले नाही.
अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचेच वर्चस्व असले, तरी आघाडीच्या घटक पक्षांनी अंबरनाथमध्ये स्वत:ची व्होटबँक टिकवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात एकूण एक लाख ४६ हजार १७६ मतदान झाले होते. त्यातील किमान एक लाख मते मिळवण्याचा प्रयत्न शिवसेना-भाजपच्या वतीने होता. प्रत्येक वॉर्डात नगरसेवकांना आणि पालिकेच्या निवडणुकीतील इच्छुकांना कामालाही लावले. भाजपचे पदाधिकारी काम करो वा न करो, शिवसेनेने संपूर्ण यंत्रणा आपल्या हाती घेतली होती.
दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे शहरात आणि पालिकेत एकमेकांविरोधात असल्याने त्यांना एकत्रित करणे अवघड जात होते. राष्ट्रवादी सेनेसोबत सत्तेत असल्याने आणि काँग्रेस पालिकेत विरोधी पक्षाची भूमिका बजावत असल्याने आघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांना या दोन्ही पक्षांना एकत्रित काम करण्यास भाग पाडणे अवघड गेले.
>सेनेसाठी विधानसभा अधिक झाली सोपी
आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करता शिवसेनेला ही निवडणूक आणखी सोपी झाली आहे. युतीत निवडणूक लढल्यास मतदानातील ५७ हजार ६६७ मतांचा आकडा हा वाढण्याची शक्यता आहे. मात्र, विधानसभेत स्वतंत्र निवडणूक लढल्यास पुन्हा या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध भाजप अशीच खरी लढत होणार आहे. त्यामुळे आघाडीच्या उमेदवाराला या मतदारसंघात प्रतिसाद मिळणे अवघड जाणार आहे.
>की फॅक्टर काय ?
पाच वर्षांत मतदारसंघातील संपर्क कायम ठेवल्याने खासदार शिंदे यांना लाभ झाला. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात शिव मंदिर आर्ट फेस्टिव्हलमुळे ते मतदारांच्या संपर्कात राहिले. गेल्या दोन वर्षांत केलेल्या कामांचा प्रभाव मतदारसंघात दिसत होता. प्रत्येक मतदारसंघात वैशिष्ट्यपूर्ण कामांवर लक्ष केंद्रित करून ते प्रकल्प पूर्ण करण्याचा केलेला प्रयत्न फायदेशीर ठरला. निवडणूक प्रचारादरम्यान विषयासाठी नव्हे, तर विजयाचे मताधिक्य वाढवण्यासाठी सुरू असलेली धडपडही यशस्वी ठरली. विजय निश्चित असतानाही त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती प्रचारात व्यस्त होती. विरोधी पक्षातील नेत्यांच्याही त्यांनी भेटी घेतल्या.

Web Title: Babaji Patil's fight against Congress-NCP fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.