निवडणूक ड्युटीला गैरहजर; कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई, ठाणे पालिकेकडून कारणे दाखवा नोटीस; कल्याणात गुन्हे दाखल होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 13:58 IST2026-01-01T13:57:49+5:302026-01-01T13:58:07+5:30
निवडणूक ड्युटीला गैरहजर; कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई, ठाणे पालिकेकडून कारणे दाखवा नोटीस; कल्याणात गुन्हे दाखल होणार

निवडणूक ड्युटीला गैरहजर; कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई, ठाणे पालिकेकडून कारणे दाखवा नोटीस; कल्याणात गुन्हे दाखल होणार
ठाणे, कल्याण : ठाणे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येणाऱ्या निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहिलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध महापालिका प्रशासनाने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. त्यातही तीन दिवस घेण्यात आलेल्या प्रशिक्षण शिबिराला ४ हजार ८०० कर्मचारी गैरहजर होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यानुसार गैरहजर अधिकारी कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असून, नोटीस मिळाल्यानंतरही जे अधिकारी कर्मचारी हजर होणार नाहीत, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही प्रस्तावित केली जाणार असल्याचे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी स्पष्ट केले आहे.
निवडणूक प्रशिक्षणास अनुपस्थित राहणे, हा केवळ शिस्तभंग नसून निवडणूक कायद्याचा गंभीर भंग असल्याचेही आयुक्तांनी नमूद केले. पालिकेच्या वतीने २७, २८ व २९ डिसेंबर रोजी पहिले प्रशिक्षण दोन सत्रांत झाले. मात्र, या शिबिराला कर्मचारी गैरहजर राहिले होते. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी २०१३ मतदान केंद्रावर एकूण १२ हजार ६५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
केडीएमसी प्रशासनाने उचलले कठोर पाऊल
कल्याण : केडीएमसीची निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पडावी, यासाठी पालिका प्रशासनाने अनेक कर्मचारी, अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. मात्र काही कर्मचारी, अधिकारी कर्तव्यावर हजर झाले नाहीत, अशा २८ कर्मचारी, अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
निवडणूक कर्तव्यावर अजूनही काही कर्मचारी हजर झालेले नाहीत
निवडणूक कर्तव्यावर अद्यापही हजर न झालेले, प्रामुख्याने व्ही एसटी, एफएसटी, एसएसटी या पथकांतील अधिकारी, कर्मचारी आणि झोनल अधिकारी म्हणून नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी सहायक आयुक्त संदीप रोकडे यांना दिले आहेत. २८ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
कर्तव्यावर हजर होण्याची एक संधी
मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर नियुक्त केलेल्या पथकातील कर्मचाऱ्यांनाही नोटिसा बजावण्यात आल्या असून त्यांना कर्तव्यावर हजर होण्याची एक संधी देण्यात आली आहे. हे कर्मचारी निवडणुकीच्या कर्तव्यावर हजर न झाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा गंभीर इशारा आयुक्त गोयल यांनी दिला आहे.
सुट्टीनिमित्त कर्मचारी गेले फिरायला
नाताळच्या निमित्ताने या शाळांना सुट्ट्या आहेत. परिणामी तेथील अनेक कर्मचारी हे सुट्टीच्या निमित्ताने फिरण्यासाठी बाहेरगावी गेले आहेत. त्यात १५ डिसेंबरला पालिका निवडणुका जाहीर झाल्या; पण तत्पूर्वीच अनेक कर्मचाऱ्यांनी डिसेंबरच्या शेवटी बाहेर फिरण्यासाठी जाण्याचे नियोजन केले होते.
२८५ कर्मचाऱ्यांना नोटिसा
भिवंडी : निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास अनुपस्थित २८५ कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. भिवंडी पालिका निवडणुकीसाठी ४,५०० कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्यासाठी मंगळवारी प्रशिक्षण घेण्यात आले होते. यावेळी मतदान केंद्रप्रमुख असलेल्या ७४ जणांना नोटीस बजावण्यात आली आहे.
२०१३ मतदान केंद्रावर एकूण १२ हजार ६५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी या नेमणुका केल्या आहेत.