भिवंडी महापालिकेत निवडणुकीला वेगळे वळण! भाजपाने महापौरपदाचा उमेदवार ऐनवेळी बदलला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 16:59 IST2026-02-18T16:57:21+5:302026-02-18T16:59:32+5:30
भिवंडी महापालिका महापौर पदाची निवडणूक तोंडावर असतानाच भाजपाने उमेदवार बदलत सगळ्यांना धक्का दिला आहे.

भिवंडी महापालिकेत निवडणुकीला वेगळे वळण! भाजपाने महापौरपदाचा उमेदवार ऐनवेळी बदलला
भिवंडी महापालिका महापौर पदाच्या निवडणुकीला वेगळेच वळण मिळाले आहे. महापौर पदाच्या निवडणुकीच्या तोंडावरच भाजपाने आपला उमेदवार बदलला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.
भाजपाने यापूर्वी नारायण चौधरी यांना पक्षाचे महापौर पदाचा अधिकृत उमेदवार घोषित केले होते. नारायण चौधरी यांनी भाजपाकडून महापौर पदासाठीचा आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे.
दरम्यान, महापौर पदाच्या निवडणुकीला बुधवारी वेगळेच वळण लागले. भाजपाचे भिवंडी शहर अध्यक्ष रविकांत सावंत यांनी महापौर पदाच्या उमेदवार म्हणून स्नेहा मेहुल पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यासंदर्भातील लेखी पत्र भाजपा शहराध्यक्षांनी भाजपाच्या सर्व नगरसेवकांना दिले आहे.
भाजपाने आता स्नेहा मेहुल पाटील यांची महापौर पदाची अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केले आहे, अशी माहिती भाजप शहराध्यक्ष रविकांत सावंत यांनी दिली आहे.
महापौर पदासाठी कोणा-कोणाचे अर्ज?
भिवंडी महापालिका महापौर पदाच्या निवडणुकीत कोणार्क विकास आघाडीचे विलास आर. पाटील यांचा मुलगा मयुरेश पाटील, पत्नी आणि माजी महापौर प्रतिभा पाटील, भिवंडी विकास आघाडीचे जावेद दळवी, काँग्रेसचे तारीक मोमीन, भाजपाकडून नारायण चौधरी, स्नेहा मेहुल पाटील, शिवसेनेकडून बाळाराम चौधरी, सुचिता म्हात्रे यांनी उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे. त्यात आता भाजपाने आपला उमेदवार बदलला आहे.