ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांच्या ५९४ जागांसाठी ३,१३८ उमेदवारांत चुरस! ३३ बिनविरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 06:13 IST2026-01-04T06:13:04+5:302026-01-04T06:13:04+5:30
अपक्ष उमेदवारांना शनिवारी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले.

ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांच्या ५९४ जागांसाठी ३,१३८ उमेदवारांत चुरस! ३३ बिनविरोध
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : जिल्ह्यातील सहा महापालिकांच्या निवडणुकांसाठी प्रचाराचा श्रीगणेशा रविवारपासून होत आहे. जिल्ह्यातील तीन महापालिकांमध्ये ३३ उमेदवार बिनविरोध विजयी झाले असून ५९४ जागांसाठी तब्बल तीन हजार १३८ उमेदवार रिंगणात आहेत. अपक्ष उमेदवारांना शनिवारी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले.
ठाणे महापालिकेत १३१ जागांसाठी हाेत असलेल्या निवडणुकीत सात जागांवर शिंदेसेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. कल्याण-डोंबिवलीत १२२ जागांसाठी ४९० उमेदवार रिंगणात असून महायुतीचे २० उमेदवार बिनविरोध निवडून आले. यात भाजपच्या १४ जागांसह शिंदेसेनेच्या सहा जागांचा समावेश आहे. आता १०२ जागांसाठी मतदान होणार असून त्यासाठी भाजप–शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना–मनसे युती, तसेच राष्ट्रवादी (अजित पवार) स्वबळावर आणि काँग्रेस–वंचित, राष्ट्रवादी (शरद पवार) स्वतंत्र ताकद आजमावणार आहे. काही ठिकाणी भाजप व शिंदेसेनेच्या उमेदवारांमध्येही थेट लढती होणार आहेत.
उल्हासनगर, नवी मुंबईत बिनविरोध विजय नाही
भिवंडीत ९० जागांसाठी ६३३ उमेदवार रिंगणात असून शिंदेसेनेचे ६ उमेदवार बिनविरोध विजयी झाले. भाजप–शिंदेसेना, काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांच्यात तिरंगी लढती अपेक्षित आहेत.
उल्हासनगरमध्ये ७८ जागांसाठी ४३२ उमेदवार रिंगणात आहेत. मीरा-भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवार मैदानात असून भाजप व शिंदेसेना यांच्यात थेट संघर्ष पाहायला मिळणार आहे.
नवी मुंबईत १११ जागांसाठी ४९९ उमेदवार रिंगणात असून, येथेही बिनविरोध विजय मिळालेला नाही. यामुळे येथे आता अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती होणार आहेत.