बार्शीत भाजपविरोधात दोन्ही शिवसेना एकत्र; संजय राऊतांची सावध भूमिका, म्हणाले, "माहिती घेतो, मगच..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 11:14 IST2026-01-24T11:05:04+5:302026-01-24T11:14:19+5:30
बार्शी जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही शिवसेना एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

बार्शीत भाजपविरोधात दोन्ही शिवसेना एकत्र; संजय राऊतांची सावध भूमिका, म्हणाले, "माहिती घेतो, मगच..."
Solapur Barshi ZP Election 2026:राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो, या प्रत्यय सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत पाहायला मिळत आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर बार्शीच्या राजकारणाने अनपेक्षित वळण घेतले आहे. राज्यात एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी असलेली ठाकरेंची सेना आणि शिंदेसेना बार्शीत मात्र भाजपविरुद्ध एकत्र आले आहेत. यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींचाही समावेश आहे. या चारही पक्षांनी मिळून स्थापन केलेल्या महाआघाडीमुळे सोलापुरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी याबाबत माहिती नसल्याची प्रतिक्रिया दिली.
बार्शीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार दिलीप सोपल यांनी सोशल मीडियावर या ऐतिहासिक आघाडीची घोषणा केली. त्यांनी 'निर्धारण मेळाव्या'चे आवाहन करत सर्व विरोधकांना एकाच व्यासपीठावर आणल्याने भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या मेळाव्यातून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले जाणार असून, सोपल यांच्या या रणनीतीने भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरण्याची शक्यता आहे.
राजेंद्र राऊतांविरुद्ध चार पक्ष एकत्र
बार्शीत अनेक दशकांपासून दिलीप सोपल विरुद्ध राजेंद्र राऊत असा संघर्ष पाहायला मिळतो. नगरपालिकेच्या निवडणुकीत राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखालील भाजपने मिळवलेल्या यशानंतर, सोपल गट सावध झाला आहे. राऊतांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी सोपल यांनी राज्यातील सत्तासंघर्ष बाजूला ठेवून स्थानिक पातळीवर शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असं सूत्र वापरले आहे. राज्यात सत्तेत असलेले शिंदे आणि अजित पवार गटाने बार्शीत मात्र विरोधी बाकावर असलेल्या ठाकरे आणि शरद पवार गटासोबत हातमिळवणी केली.
संजय राऊत यांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका
दरम्यान, या नव्या संजय राऊत यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. "त्या विषयी माझ्याकडे माहिती आलेली नाही. शिंदे गटाविषयी आमच्या भावना तीव्र आहेत. माझ्याकडे त्यासंदर्भात माहिती नाही. बार्शीतील या घडामोडींची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याशिवाय मी भाष्य करणार नाही," असे त्यांनी स्पष्ट केले. यावरून स्थानिक पातळीवरील ही आघाडी पक्षश्रेष्ठींच्या संमतीने झाली आहे की नेत्यांनी स्वतःहून हा निर्णय घेतला, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.