ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 17:14 IST2025-12-29T17:09:06+5:302025-12-29T17:14:34+5:30
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर सांगोला शहरातील रस्ते, नगरपरिषद इमारतीसाठी नव्याने व भुयारी गटाराच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी असा कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे शहाजी बापूंनी सांगितले.

ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
सांगोला - स्व. गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर या तालुक्याचा स्वाभिमान कोठेतरी चेपला जातोय म्हणून सांगोला शहरातील जनतेच्या स्वाभिमानासाठी सर्व ताकदीने स्वबळावर निवडणूक लढवून नगर परिषदेवर भगवा फडकविला. मी तुम्हाला खात्रीने सांगतो नगर परिषद निवडणुकीत ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं. त्यांना स्वर्गातच उद्या जागा मिळणार असल्याचे शिंदेसेने माजी आमदार शहाजी पाटील यांनी सांगितले.
शिंदेसेनेने स्वबळावर निवडणूक लढवून नगराध्यक्षपदासह १५ सदस्य प्रचंड मतांनी निवडून एकहाती सत्ता दिल्याबद्दल शिंदेसेनेच्या वतीने विजयी सभा आयोजित केली होती. त्यात शहाजी पाटील बोलत होते. यावेळी शहाजी पाटील म्हणाले की, सांगोला शहरातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी लढाई होती. सांगोल्याची ओळख महाराष्ट्राच्या इतिहासात वेगळी असून या ठिकाणी हुकूमशाही पद्धतीने कोण जर राजकारण करणार असाल तर सांगोल्यातील जनता कधीही खपवून घेणार नाही. भाजपसोबत आली असती तर निम्मेला निम्म्या जागेला भागीदार झाली असती परंतु पालकमंत्र्यांना पटविण्यात दीपक साळुंखे-पाटलांसह भाजप नेते यशस्वी झाले तरीही यापुढे मी महायुतीशी प्रामाणिक राहणार आहे. चिंतन करण्यापेक्षा मन साफ करा, असा सल्ला त्यांनी दिला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर सांगोला शहरातील रस्ते, नगरपरिषद इमारतीसाठी नव्याने व भुयारी गटाराच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी असा कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे शहाजी बापूंनी सांगितले.
मी नसतो तरी तुम्ही निवडून आला असता
२०१६ राणी माने नगराध्यक्ष झाल्या म्हणून २०१९ साली मी आमदार झालो आणि २०१९ साली मी आमदार झालो म्हणून आनंदा माने तुम्ही आता नगराध्यक्ष झालात. कदाचित मीही तुमच्यासोबत नसतो तर आनंद माने तुम्ही निवडून आला असता. गणपतराव देशमुख व मी कायम एका विचारधारेवर काम केलंय असेही शहाजी पाटील म्हणाले.