Akkalkot Swami Samarth: स्वामी समर्थांच्या भक्तांची फसवणूक; भक्त निवास बुकिंगच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 07:45 PM2022-12-13T19:45:12+5:302022-12-13T19:46:13+5:30

Akkalkot Swami Samarth: अक्कलकोट येथील स्वामी समर्थ भक्त निवासाच्या नावाखाली अनेकांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.

swami samarth maharaj temple akkalkot solapur bhakta niwas booking cyber crime fraud | Akkalkot Swami Samarth: स्वामी समर्थांच्या भक्तांची फसवणूक; भक्त निवास बुकिंगच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांचा गंडा

Akkalkot Swami Samarth: स्वामी समर्थांच्या भक्तांची फसवणूक; भक्त निवास बुकिंगच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांचा गंडा

googlenewsNext

Akkalkot Swami Samarth: अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थ महाराज हे कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दररोज हजारोंच्या संख्येने अक्कलकोटात भाविक स्वामींच्या दर्शनासाठी येत असतात. केवळ मुंबई, पुणे महाराष्ट्रातून नाही, तर परराज्यातूनही भाविक मोठ्या प्रमाणावर अक्कलकोटला येत असतात. येथे आल्यावर राहण्याची गैरसोय होऊ नये, यासाठी बुकिंग केले जाते. याचाच फायदा काहींनी उचलला. स्वामी समर्थ भक्त निवासाच्या नावाखाली अनेकांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांत या सायबर गुन्हेगारांनी अनेक स्वामी भक्तांना फसवल्याची माहिती आहे. 

अक्कलकोटला आल्यानंतर राहण्याची व्यवस्था व्हावी यासाठी अनेक जण मंदिर आणि अन्नछत्र मंडळाच्या भक्त निवासाचा पर्याय निवडतात. दुसऱ्या जिल्ह्यातून येणारे भाविक इंटरनेटचा वापर करुन भक्त निवासाबद्दल माहिती सर्च करतात. याचाच गैरफायदा या सायबर गुन्हेगारांनी उचलला आणि भक्त निवासाच्या नावाने खोटी माहिती आणि फोन नंबर ऑनलाईन संकेतस्थळावर दिली. या फसव्या संकेतस्थळावर वटवृक्ष स्वामी महाराज भक्त निवासाचे फोटो आणि अन्यच कुठल्या तरी हॉटेल्सचे फोटो लावून लोकांना आकर्षित केले. यासोबत दिलेल्या मोबाईल नंबरवर भाविक बुकिंगसाठी संपर्क करायचे, त्यावेळी त्यांचे आधार कार्ड मागितले जायचे. तसेच आगाऊ रक्कम म्हणून पैसे पाठवयाला सांगितले जायचे. ऐनवेळी गैरसोय होऊ नये, म्हणून अनेक भाविकांनी ७०० ते १२०० रुपये या नंबरवर पाठवले आहेत. 

मंदिर प्रशासनाची पोलिसांकडे तक्रार, प्रकरण सायबर शाखेकडे वर्ग

या ऑनलाईन माहितीद्वारे भक्त निवास बुकिंग झाल्याचे समजून भाविक अक्कलकोटला पोहोचायचे, तेव्हा त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात यायचे. साधारण १५ ते २० भाविकांनी अशा पद्धतीने फसवणूक झाल्याची माहिती मंदिर प्रशासनाला कळवली. त्यानंतर मंदिर प्रशासनाने देखील यासंदर्भात लोकांकडून माहिती घेऊन अक्कलकोट पोलिसांकडे तक्रार दिली आहे. अक्कलकोट पोलिसांनी ही तक्रार सायबर पोलिसांकडे वर्ग केल्याची माहिती आहे. मात्र, फसवणूक झालेल्या भाविकांची संख्या वाढू शकते, असे म्हटले जात आहे. शिवाय फसवणूक झालेल्या भाविकांना ऐनवेळी पर्यायी व्यवस्था शोधण्याचा मनस्ताप आणि भूर्दंड सहन करावा लागला. 

दरम्यान, अक्कलकोटला येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी यासाठी वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर समितीतर्फे भक्त निवास सुरु करण्यात आले. कोणीही गैरफायदा घेऊ नये आणि सर्वसामान्य भाविकांना सोय व्हावी यासाठी प्रशासनाने फोनद्वारे किंवा ऑनलाईन बुकिंग सुविधा सुरु केलेली नाही. जे भाविक आधी येतील त्यांना आधी रुम मिळेल हेच तत्व अनेक वर्षांपासून सुरु आहे. त्यामुळे भाविकांना सायबर गुन्हेगारांच्या भूलथापास बळी पडू नये असे आवाहन मंदिर समितीच्यावतीने करण्यात आले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: swami samarth maharaj temple akkalkot solapur bhakta niwas booking cyber crime fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.