धक्कादायक; पुण्याच्या स्वामी भक्ताने अक्कलकोटमधील लॉजमध्ये घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 09:35 IST2021-11-19T09:35:42+5:302021-11-19T09:35:46+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

धक्कादायक; पुण्याच्या स्वामी भक्ताने अक्कलकोटमधील लॉजमध्ये घेतला गळफास
अक्कलकोट : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आलेल्या पुण्याच्या भक्ताने एका लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत घडली आहे. याबाबत उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळासाहेब चंद्रशा गवळी (वय ४९, रा. कर्वेनगर, पुणे) असे त्या आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त अक्कलकोट येथे येऊन एस. टी. स्टँडसमोरील अयोध्या लॉजवर उतरले. स्वामी समर्थ मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेतले. पुन्हा लॉजवर येऊन आतून कडी घालून रूममधील पंख्याच्या हुकाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. संध्याकाळी दरवाजा उघडत नसल्याने लॉजचालकांनी पोलिसांना बोलावून दार उघडले असता, हा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत लॉजचालक कमलेश बन्सीलाल परिआर (रा. बॅगेहळ्ळी रोड, अक्कलकोट) यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास हवालदार राजाराम फुलारी करीत आहेत.