सोलापूर: निवडणुका बिनविरोध करण्यासाठीच 'तो' मर्डर! प्रणिती शिंदेंचा भाजपावर गंभीर आरोप
By आप्पासाहेब पाटील | Updated: January 3, 2026 16:22 IST2026-01-03T16:21:18+5:302026-01-03T16:22:17+5:30
Praniti Shinde on Balasaheb Sarvade Murder, Solapur Municipal Election 2026: मनविसे शहराध्यक्षाचा खूनाच्या घटनेतून भाजप कार्यकर्त्यांची गुंड प्रवृत्ती उघड झाल्याचीही टीका

सोलापूर: निवडणुका बिनविरोध करण्यासाठीच 'तो' मर्डर! प्रणिती शिंदेंचा भाजपावर गंभीर आरोप
Praniti Shinde on Balasaheb Sarvade Murder, Solapur Municipal Election 2026: आप्पासाहेब पाटील, सोलापूर: बिनविरोध निवडणूक करण्यासाठी भाजपाने निवडणूक काळात प्रत्येक प्रभागात दमदाटी करणे, उमेदवारांवर उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव आणणे, मारहाण करणे तसेच विविध प्रकारे दहशत निर्माण करणे असे प्रकार सर्रास सुरू केले आहेत. त्यामुळे सोलापूर शहरात विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांना भयमुक्त वातावरणात फिरणे व प्रचार करणे अवघड झाले आहे. सोलापुरात शुक्रवारी झालेल्या मनविसे शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांच्या खूनाच्या घटनेतून भाजप कार्यकर्त्यांची गुंड प्रवृत्ती उघड झाली आहे. बिनविरोध निवडणुका करण्यासाठीच तो खून करण्यात आल्याचा गंभीर आरोप खा. प्रणिती शिंदे यांनी केला आहे.
शनिवारी सकाळी खा. प्रणिती शिंदे यांनी पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांची भेट घेऊन सखोल चौकशी करण्याची मागणी केली. यासंदर्भात महाविकास आघाडीच्या वतीने सोलापूर पोलिस आयुक्तालयात पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांना निवेदन देण्यात आले. सोलापूर महानगरपालिका सार्वजनिक निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू असून सर्व राजकीय पक्ष निवडणुकीत सहभागी झाले आहेत. सोलापूर शहरात नेहमीच कोणतीही कटुता न आणता खेळीमेळीच्या वातावरणात निवडणुका लढविण्याची सुसंस्कृत परंपरा राहिली आहे. मात्र, सत्तेच्या बळावर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून या परंपरेला काळिमा फासला जात असल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाने योग्य ती दक्षता घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच भाजप कार्यकर्त्यांकडून मनसेच्या पदाधिकाऱ्याची झालेल्या हत्येप्रकरणी खुनाचा सूत्रधार व मारेकरी यांच्यातील मोबाईल संवादाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणीही करण्यात आली आहे.
यावेळी खा. प्रणिती शिंदे, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश गादेकर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाध्यक्ष अजय दासरी, शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड, अशोक निंबर्गी, भारत जाधव, युसुफ मेजर, प्रताप चव्हाण, तिरूपती परकीपंडला, अँड केशव इंगळे आदी उपस्थित होते. तसेच खासदार प्रणिती शिंदे आणि महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींनी खुनी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या बाळासाहेब सरवदे यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.