फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 10:04 IST2025-12-27T10:03:56+5:302025-12-27T10:04:46+5:30
राजीनामा देण्याची तयारी, सुभाषबापूंनी मन वळविल्याची चर्चा

फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
सोलापूर : महापालिका निवडणूक जाहीर होण्यापूर्वी ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यापैकी काहीजणांना उमेदवारी द्यावी लागेल, असा निरोप भाजपच्या एका बड्या नेत्याने भाजपच्या आमदारांना दिला. या निरोपामुळे आमदार विजयकुमार देशमुख यांनी बंडाचा पवित्रा घेऊन थेट राजीनामा देण्याची तयारी दाखविली. या पार्श्वभूमीवर आ. सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी सकाळी विजयकुमारांचे 'सिद्धलिला' निवासस्थान गाठले. या ठिकाणी दोघांमध्ये चर्चा झाली आणि कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभे राहण्याचा निर्णय झाला. दरम्यान, देशमुखांच्या या पवित्र्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शुक्रवारी तातडीने मुंबई गाठली.
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
आ. विजयकुमार देशमुख यांच्या मातोश्रींना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे ते तीन दिवस रुग्णालयात थांबून होते. त्यांचे कार्यकर्ते त्यांची भेट घेत होते. शहरातील प्रवेशांवर चर्चा सुरू होती. तोपर्यंत एका भाजप नेत्याकडून देशमुखांना फोन आला. भाजपमध्ये प्रवेश करताना आम्ही काहीजणांना शब्द दिले आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी द्यावी लागेल, असे वरिष्ठ नेत्याने सांगितले.
मीसुद्धा माझ्या कार्यकर्त्यांना शब्द दिला आहे. प्रवेश करणाऱ्या लोकांनी आजवर पक्षाच्या विरोधात काम केले. त्यांना उमेदवारी देऊन कसे चालेल, असे देशमुख म्हणाले. हा फोन संपताच देशमुखांना आपले कार्यकर्ते अडचणीत येणार असल्याचा अंदाज आला. त्यामुळे त्यांनी शुक्रवारी आपल्या दूतांमार्फत भाजपच्या श्रेष्ठींना बंडाचा इशारा दिला. पालकमंत्री गोरे दुपारी एक वाजता शहरात दाखल झाले. तोपर्यंत देशमुखांच्या बंडाच्या पवित्र्याची शहरभर चर्चा झाली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबईत बैठक आयोजित केली. विमानाने पालकमंत्री गोरे, आ. देवेंद्र कोठे, शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, मनीष देशमुख मुंबईला रवाना झाले. आमदार सचिन कल्याणशेट्टी मुंबईत होते. तेसुद्धा प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीत सहभागी झाले.
सहानुभूती तयार करण्याचा प्रयत्न
शहर उत्तरमधील किमान १२ देशमुख समर्थकांची उमेदवारी धोक्यात आहे. हा धोका ओळखून शिंदेसेनेसोबत बोलणी सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आ. विजयकुमार यांनी काहीजणांकडे आमदारकीचा राजीनामा देण्याची इच्छा बोलून दाखवली. विशेषतः सुभाषबापूंनी त्यांना परावृत्त केल्याचे सांगण्यात येते. दुसरीकडे शहर उत्तरचे कार्यकर्ते सहानुभूती तयार करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
ज्यांची उमेदवारी कापणार त्यांच्या खांद्यावर बापूंचा हात
आ. सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी सकाळी आ. विजयकुमार देशमुख यांची भेट घेतली. या भेटीवेळी सुभाषबापूंनी माजी सभागृह नेता शिवानंद पाटील यांच्या खांद्यावर सहज हात ठेवला होता. देशमुखांच्या विरोधी गटाकडून यंदा शिवानंद पाटलांची उमेदवारी कापली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुभाषबापूंनी पाटलांच्या खांद्यावर ठेवलेला हात चर्चेचा विषय ठरला.
शिंदेसेनेसोबत जुळवाजुळव
शहर उत्तरमधील देशमुख समर्थकांच्या कालपासून शिंदेसेनेसोबत बैठका सुरू आहेत. अनेक प्रभागांतून देशमुख समर्थक बंडखोरी करतील.
या बंडखोरांसोबत राहण्याचा निर्णय देशमुखांनी घेतला आहे. भाजपतील या वादामुळे महाआघाडीतील जागावाटप थांबल्याची कुजबुज आहे.
प्रदेशचे नेते पुन्हा नाराज
शहरातील घडामोडींवर चर्चा करण्यासाठी प्रदेश भाजपने मुंबईत बैठक बोलावली. या बैठकीसाठी सुभाषबापू गटाकडून मनीष देशमुख गेले. आमदार विजयकुमार देशमुख यांनी मात्र आपला प्रतिनिधी पाठविण्यास नकार दिला. त्यामुळे प्रदेश भाजपचे नेते नाराज झाल्याची चर्चा ऐकायला मिळाली.