उद्धवसेनेत तांडव.. दासरींनी पैसे घेऊन तिकिटं विकल्याचा आरोप; दासरी हटाव मोहीम, निष्ठावंत एकवटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 11:57 IST2025-12-30T11:56:50+5:302025-12-30T11:57:36+5:30
जिल्हा प्रमुख संतोष पाटील यांचा राजीनामा

उद्धवसेनेत तांडव.. दासरींनी पैसे घेऊन तिकिटं विकल्याचा आरोप; दासरी हटाव मोहीम, निष्ठावंत एकवटले
सोलापूर: उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस येऊन ठेपला तरी उद्धवसेनेतील वाद काही शमेना. आता उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. अजय दासरी यांनी पैसे घेऊन तिकीट विकल्याचा आरोप करत, जोपर्यंत त्यांना पक्षातून काढले जात नाही, तोपर्यंत पक्षात काम करणार नाही. निष्ठावंत म्हणून पक्षाचे काम करणार. ज्या निष्ठावंतांना तिकीट देण्यात आले आहे, त्यांचाच प्रचार करू, इतर ठिकाणी विरोधात काम करण्याचा इशारा शहरप्रमुख महेश धाराशिवकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी सोमवारी दिला.
उद्धवसेनेचे शहरप्रमुख महेश धाराशिवकर, प्रताप चव्हाण, शहर संघटक सुरज जगताप, विधानसभा प्रमुख बाळासाहेब गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत नाराज पदाधिकाऱ्यांची बैठक शुक्रवार पेठेतील हॉटेलमध्ये झाली. कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख दासरी यांनी पैसे घेऊन उमेदवारी दिली. ज्या महत्त्वाच्या जागा होत्या त्या जागाही दासरी यांनी सोडल्याचा गंभीर आरोप केला. शिवाय पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याचे जाहीर केले.
यावेळी प्रताप चव्हाण म्हणाले, पूर्वी सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन उमेदवारी दिली जात होती. पण आता असे होत नाही. तक्रार केल्यानंतर पक्षही दखल घेईना. मीनाक्षी गवळी यांनी तिकीट देताना निष्ठावंतांचा विचार केला नाही, असे म्हणत अस्मिता गायकवाड यांच्यावर टीका करत त्यांना पक्षातून बाहेर काढा, अशी भूमिका मांडली. विपत श्रीराम यांनी ज्या प्रभाग ७ मधून शिवसेनेचा पहिला नगरसेवक शहरात झाला होता, ती जागा मित्रपक्षाला का सोडली. जिल्हाप्रमुख हे आता आंदोलनाला आम्हाला.. तिकीट दुसऱ्यांना...शहरात ज्या-ज्या मागण्यांसाठी आंदोलन झाले तेव्हा फोन करून आम्हाला बोलावले. आम्ही पक्षासाठी २४ तास हजर राहिलो. पण उमेदवारी देण्याची वेळ आल्यानंतर दुसऱ्यांना दिली. त्यांनी उद्धवसेनेचे खच्चीकरण केले आहे. ते असेपर्यंत आम्ही पक्षात काम करणार नाही. आम्ही सामूहिक राजीनामा देऊ, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली. जिल्हाप्रमुख अजय दासरी यांच्यावर झालेल्या आरोपाबाबत त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
पद, प्रतिष्ठा सोडून पैशाच्या मागे लागल्याचा आरोप त्यांनी केला. गवळी यांनी युती करताना कार्यकर्त्यांना विचारत घ्यायला हवे होते, असे म्हणत नाराजी व्यक्त केली. यावेळी वैशाली सातपुते यांनीही निवड समितीवर आरोप केला. उद्धवसेनेतील नाराज पदाधिकारी बैठक घेताना मंचावर डावीकडून सूरज जगताप, शहरप्रमुख महेश धाराशिवकर, प्रताप चव्हाण, बाळासाहेब गायकवाड.
जिल्हाप्रमुख पाटलांचा उद्धवसेनेला जय महाराष्ट्र उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांनी सोमवारी पक्षाला जय महाराष्ट्र केलं. महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी पक्षातील अंतर्गत वादामुळे राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.
ते स्वतः प्रभाग २४ मधून इच्छुक होते. त्यांची पत्नीही इच्छुक होत्या. त्यांच्या पत्नीला भाजपमधून तिकीट मिळत असल्याने राजीनामा दिल्याचे उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
तक्रारींकडे नेत्यांची पाठ
निवडणुका जाहीर झाल्यापासून उद्धवसेनेत चाललेला गोंधळ काही संपत नाही. दररोज पक्षातील नवे प्रकरण बाहेर पडत आहे. याकडे पक्षाचे ज्येष्ठ नेते मात्र दुर्लक्ष करत आहेत.
उद्धवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे, सोलापूरचे संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांनी या सोलापूरकडे पाठ फिरवल्याचे चित्र असून, पक्षात एवढा गोंधळ सुरू असताना मागील दहा दिवसापासून ते सोलापुरात एकदाही फिरकले नाहीत.
माजी मंत्र्याच्या कन्येचा राजीनामा
माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांची मुलगी पूजा खंदारे यांनी जिल्हा युवती सेना सहसचिवपदाचा सोमवारी राजीनामा दिला. त्यांनी पक्षाला जय महाराष्ट्रचे पत्र लिहिले. त्यानंतर सायंकाळी त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला.