भाजपविरोधात शिंदेसेना-अजित पवार गटाची युती, महापालिकेसाठी तिरंगी लढत होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 12:13 IST2025-12-29T12:12:05+5:302025-12-29T12:13:33+5:30
निम्म्या ५१-५१ जागांवर एकमत : कृषिमंत्री दत्तामामा भरणे, सिद्धाराम म्हेत्रे यांच्या चर्चेनंतर निर्णय

भाजपविरोधात शिंदेसेना-अजित पवार गटाची युती, महापालिकेसाठी तिरंगी लढत होण्याची शक्यता
सोलापूर : महापालिका निवडणुकीत भाजपविरोधात युती करण्याचा निर्णय शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) च्या नेत्यांनी रविवारी जाहीर केला. दोन पक्षांनी एकूण १०२ पैकी ५१-५१ जागा लढवण्याचा निर्णय घेतला. भाजपच्या पाच वर्षातील कारभाराला सोलापूरकर कंटाळले आहेत. त्यामुळे ही युती केल्याचे शिंदेसेनेचे अमोल शिंदे, राष्ट्रवादी (अजित पवार) चे संतोष पवार यांनी सांगितले. दरम्यान, महापालिकेसाठी भाजप, शिंदेसेना राष्ट्रवादी (अजित पवार) युती आणि महाविकास आघाडी अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
महापालिका निवडणुकीतील जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी भाजप शिंदेसेना, राष्ट्रवादी (अजित पवार) यांनी युती जाहीर केल्यानंतर उपस्थित असलेले डावीकडून राष्ट्रवादी (अजित पवार) चे कार्याध्यक्ष जुबेर बागवान, सुधीर खरटमल, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, संतोष पवार, अमोल शिंदे, महेश साठे, आनंद चंदनशिवे, मनीष काळजे आदी.
आणि शिंदेसेनेच्या नेत्यांमध्ये दोन बैठका झाल्या. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शिंदेसेनेचे संपर्कप्रमुख संजय कदम यांनी ४२ जागांची मागणी केली होती. परंतु, भाजपने १० जागा सोडण्याची तयारी दाखवली. यादरम्यान, राष्ट्रवादी (अजित पवार) चे संपर्कमंत्री दत्तामामा भरणे आणि माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्यात रविवारी रात्री १ वाजता युतीबाबत बोलणी झाली. दोघांनी निम्म्या जागा वाटून घेणे, जागा वाटपाचे अधिकार स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून घेण्याचा निर्णय घेतला.
गांधीनगर येथील एका हॉटेलमध्ये युतीची घोषणा झाली. यावेळी शिंदेसेनेचे सिद्धाराम म्हेत्रे, अमोल शिंदे, मनोज शेजवाल, अमर पाटील, महेश साठे, राष्ट्रवादी (अजित पवार) चे संतोष पवार, जुबेर बागवान, आनंद चंदनशिवे, सुधीर खरटमल आदी उपस्थित होते.
महाविकास आघाडीचे जागा वाटप
निश्चित झाले आहे. शिंदेसेना-राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्या युतीचे जागा वाटप रविवारी निश्चित होणार आहे. तीन जणांच्या लढतीत एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, बसप यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.
महापालिका निवडणूक तिरंगी होणार असल्यामुळे प्रत्येक प्रभागात चुरस वाढणार आहे. उमेदवारानाही प्रचारासाठी परिश्रम घ्यावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.
कुठे फिस्कटली चर्चा
भाजप आमदारांमध्ये उमेदवारीवरून गोंधळ सुरू आहे. आ. विजयकुमार देशमुख शहर उत्तर मतदारसंघातील दोन-चार जागा शिंदेसेनेला सोडायला तयार होते. पण आ. देवेंद्र कोठे सोडायला तयार नव्हते. आ. कोठे यांनी शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्याविरोधात प्रभाग ७मध्ये फिल्डिंग लावली आहे. पक्षाच्या जिल्हाप्रमुखांच्या विरोधात भाजप तयारी करत असल्यामुळे युती होणार नाही, याचा अंदाज आला होता. त्यातून अमोल शिंदे, संतोष पवार यांच्यात युतीबाबत बोलणी सुरू होती.
विधानसभेला शिंदेसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्यामुळे राज्यात भाजपची सत्ता आली. त्या शिवसैनिकांना भाजपने जागा वाटपात दिलेली वागणूक लोकांना आवडलेली नाही. प्रश्न केवळ जागा वाटपाचा नाही. सोलापूर महापालिकेत काँग्रेसची सत्ता उधळून लोकांनी भाजपला सत्ता दिली होती. पण सोलापूरकरांना केवळ भाजपची भांडणे बघायला मिळाली. त्यामुळे आम्ही भाजपसोबत न जाता राष्ट्रवादी (अजित पवार) सोबत युती करण्याचा निर्णय घेतला.
अमोल शिंदे, जिल्हाप्रमुख, शिंदेसेना
शहरात रोज पाणीपुरवठा करतो म्हणून अनेक पक्ष सत्तेवर आले. त्या पक्षांनी जनतेची दिशाभूल केली. आम्ही अनेक प्रभागांत फिरलो. त्यावेळी शिंदेसेनेसोबत युती करावी, असा नागरिकांचा सूर आला. त्यातून आम्ही एकत्र आलो आहोत.
संतोष पवार, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी (अजित पवार)