आ. विजयकुमार देशमुख यांचा असंतोष ३० तासात मावळला; मुंबईच्या बैठकीत उमेदवार निश्चित
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 10:53 IST2025-12-28T10:50:41+5:302025-12-28T10:53:07+5:30
पालकमंत्र्यांकडे सोपवली शहर उत्तरची यादी

आ. विजयकुमार देशमुख यांचा असंतोष ३० तासात मावळला; मुंबईच्या बैठकीत उमेदवार निश्चित
सोलापूर : भाजपचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात बंडाचा पवित्रा घेणारे आ. विजयकुमार देशमुख यांचा असंतोष शनिवारी ३० तासानंतर मावळला. सायंकाळी सहा वाजता होटगी रोडवरील हॉटेलमध्ये जाऊन शहर उत्तरमधील आपल्या उमेदवारी यादी पालकमंत्र्यांकडे सुपूर्द केली. दरम्यान, भाजपच्या शहर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील उमेदवारांच्या यादीवर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शुक्रवारी रात्री मुंबईत चर्चा झाली. शहरातील चार प्रभागात उमेदवार निश्चित करण्यावरून आमदारांमध्ये मतभेद आहेत. या वादांच्या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेणार आहेत.
फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
भाजपमध्ये निष्ठावंतांना किंमत राहिली नाही. माझ्या कार्यकर्त्यांनी इतर पक्षातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला तर मी त्यांच्यासोबत राहीन, असे अशी भूमिका आ. देशमुखांनी शुक्रवारी घेतली होती. यावरून बराच गदारोळ झाला. पालकमंत्री जयकुमार गोरे शनिवारी सायंकाळी चार वाजता शहरात दाखल झाले. आ. विजयकुमार देशमुख यांनी त्यांची भेट घेतली. दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. आ. देशमुखांनी शहर उत्तरमधील उमेदवारांची यादी प्रदेश नेते रघुनाथ कुलकर्णी यांच्याकडे दिली होती. परंतु, ही यादी पालकमंत्री गोरे यांच्याकडे आलेली नव्हती. अखेर ही यादी देशमुखांनी गोरे यांच्याकडे सादर केली. यात १ ते १२ प्रभागातील उमेदवारांचा समावेश आहे.
दिलीप माने गटाला चार जागांचा पर्याय
माजी आ. दिलीप माने गटाकडून १० जागांवर तयारी सुरू आहे. परंतु, भाजप नेत्यांकडून माने गटाला तीन ते चार जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील निरोप मुंबईतून येणार आहे. यांच्या आदेशानुसार मी काम करीत आहे. तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मुख्यमंत्र्यांसोबत बोलून अडचण दूर करा. उमेदवार ठरविण्यात माझा कोणताही हस्तक्षेप राहणार नाही, असे गोरे यांनी स्पष्ट केले.
प्रभाग २२ चा निर्णय मुंबईत होणार
आ. सुभाष देशमुख यांनी प्रभाग २२ मधून शितल गायकवाड या कार्यकर्त्याची उमेदवारी जाहीर केली होती. या प्रभागात आ. देवेंद्र कोठे यांनी राष्ट्रवादीचे किसन जाधव, नागेश गायकवाड यांना प्रवेश दिला आहे. त्यामुळे या प्रभागातील उमेदवारीचा निर्णय मुंबईत होणार आहे.
नाना काळे, प्रथमेश यांचे काय होणार
शहर उत्तरमधील प्रभाग ७मधून नाना काळे यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी भूमिका आ. देवेंद्र कोठे यांनी घेतली आहे. परंतु, हा प्रभाग आपल्या मतदारसंघात येतो. नाना काळे यांनी भाजपच्या विरोधात काम केले.
त्यामुळे मीच उमेदवार ठरविणार, असे आ. देशमुखांचे म्हणणे आहे. प्रभाग १० आणि ११ मध्ये आ. कोठे आणि प्रथमेश कोठे यांनी आठपैकी बहुतांश जागांची मागणी केली आहे. या तीन ठिकाणचा विषय बाजूला ठेवा. या सर्व विषयांवर आता मुख्यमंत्री फडणवीस घेतील, असे देशमुखांना सांगण्यात आले.
मुंबईच्या बैठकीत कुलकर्णीची उपस्थिती
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घेतलेल्या बैठकीला पालकमंत्री जयकुमार गोरे, रघुनाथ कुलकर्णी, राजेश पांडे, मकरंद देशपांडे, आ. देवेंद्र कोठे, शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, मनीष देशमुख आदी उपस्थित होते. या बैठकीत शहर उत्तरची यादीच आलेली नव्हती. त्यामुळे ही यादी आ. देशमुख यांच्याकडून मागवून घ्यावी असे सांगण्यात आले.