इंद्रभुवनात इच्छुकांची लगीनघाई, 'एनओसी' मिळेना, निरसन होईना काय करू, कसे होणार यातच अनेकांचा दिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 10:04 IST2025-12-25T10:02:43+5:302025-12-25T10:04:54+5:30
दररोज २०० हून अधिक नागरिकांचे अर्ज

इंद्रभुवनात इच्छुकांची लगीनघाई, 'एनओसी' मिळेना, निरसन होईना काय करू, कसे होणार यातच अनेकांचा दिवस
सोलापूर : महापालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्जासोबत उमेदवारांना विविध खात्याची नाहरकत प्रमाणपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. नाहरकत प्रमाणपत्रांसाठी अर्ज देणे आणि ही प्रमाणपत्रे घेण्यासाठी इंद्रभुवनात बुधवारी दिवसभर मोठी गर्दी होती. सायंकाळी वाहने लावायला जागा नव्हती. अनेकांनी ही प्रमाणपत्रे वेळेवर मिळत नसल्याची तक्रार केली.
महापालिका प्रशासनाने नाहरकत प्रमाणपत्रे देण्यासाठी नॉर्थकोटमध्ये एक खिडकी कक्ष सुरू केला. हा कक्ष मंगळवारपासून प्रशासकीय इमारतीमध्ये हलविण्यात आला. नॉर्थकोटमध्ये ज्यांचे अर्ज भरुन घेतले. त्यापैकी काहीजणांना पुन्हा अर्ज करायला सांगण्यात आले. उमेदवारांना कर संकलन विभाग, गवसु विभागाची थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे. नगर अभियंता विभागाकडून मक्तेदार नसल्याचे प्रमाणपत्र, भूमी व मालमत्ता विभागाकडून गाळे अथवा जागा भाड्याने घेतली नसल्याचा दाखला आणि घरात शौचालय असल्याचा दाखला देणे आवश्यक आहे.
विविध विभागांचे नाहरकत दाखले घेण्यासाठी आलेल्या इच्छुकांमुळे इंद्रभुवनाच्या बाहेर वाहनांची दाटी झाली होती.
आणखी एका कक्षाची मागणी
निवडणूक अर्जासोबत आधारकार्ड, पॅनकार्डसोबत जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र, आयकर विवरणपत्र, स्थावर मालमत्तेची संपूर्ण कागदपत्रांसह माहिती देणे आवश्यक आहे. अनेक माजी नगरसेवक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना तीन वर्षांचे आयकर विवरणपत्र जोडायचे की एका वर्षाचे जोडायचे याबद्दलची माहिती विचारत होते. स्थावर मालमत्तेच्या मूल्यांकनाची केवळ माहिती द्यायची की दाखले जोडायची याबद्दलची विचारणा करीत होते. प्रत्येक जण वेगवेगळी माहिती सांगत होते. त्यामुळे यासंदर्भात उमेदवारांचे शंका निरसन करणारा कक्ष असावा, अशी मागणी पुढे आली.
एकाचवेळी अनेक अर्ज दाखल होत आहेत. एक अर्जाची पाच विभागांकडून तपासणी होते. त्यामुळे नाहरकत मिळायला वेळ लागत आहे. परंतु, एकही अर्ज प्रलंबित राहणार नाही. लवकरात लवकर अर्ज निकाली काढण्याचा प्रयत्न करू.
आशिष लोहकरे, उपायुक्त, महापालिका.
महिलांसाठी हवा स्वतंत्र कक्ष
नाहरकत दाखले घेण्यासाठी अनेक महिला येत आहेत.
पालिकेच्या कक्षात आणि 3 खिडकीबाहेर पुरुषांची मोठी गर्दी असते.
या गर्दीमुळे अनेक महिलांची अडचण होत असल्याचे बुधवारी दिसून आले.
अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी याबाबत काळजी घेण्यात येईल, असे सांगितले.