Solapur Municipal Corporation Election 2026 : देशमुखांचे २६ बंडखोर रिंगणात, आज माघारीचा दिवस ; रणनीती ठरविण्यासाठी दिवसभर घेतल्या बैठका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 13:50 IST2026-01-02T13:48:25+5:302026-01-02T13:50:55+5:30
महापालिका निवडणुकीसाठी दाखल झालेले उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शुक्रवारी दुपारी ३ पर्यंतची मुदत आहे. भाजपने एकूण २६ प्रभागातून १०२ जणांना उमेदवारी दिली.

Solapur Municipal Corporation Election 2026 : देशमुखांचे २६ बंडखोर रिंगणात, आज माघारीचा दिवस ; रणनीती ठरविण्यासाठी दिवसभर घेतल्या बैठका
लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर : महापालिका निवडणुकीत भाजपने आ. विजयकुमार देशमुख आणि आ. सुभाष देशमुख यांच्या २६ उमेदवारांचे पत्ते कापले. या २६ जणांची बंडखोरी आणि देशमुखांची रणनीती भाजपसाठी अडचणीची ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बंडखोरांकडे शुक्रवारी लक्ष असणार आहे.
महापालिका निवडणुकीसाठी दाखल झालेले उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शुक्रवारी दुपारी ३ पर्यंतची मुदत आहे. भाजपने एकूण २६ प्रभागातून १०२ जणांना उमेदवारी दिली. आ. विजयकुमार देशमुख यांच्या शिफारशीनुसार ३०, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आ. देवेंद्र कोठे ४८, आ. सुभाष देशमुख २१ आणि माजी आमदार दिलीप माने यांच्या शिफारशीनुसार तीन जणांना उमेदवारी मिळाली.
जागा वाटपात आ. कोठे यांनी बाजी मारली. त्यासाठी त्यांनी पक्षाकडे सबळ कारणे दिली. मात्र, यातून संघर्ष उभा राहिला आहे. या सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी दोन देशमुखांच्या समर्थकांनी वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेतल्या. या बैठकीतील रणनीती यशस्वी ठरते की नाही याचा उलगडा शुक्रवारी होणार आहे.
लक्ष शीतल गायकवाड यांच्या भूमिकेकडे
आ. सुभाष देशमुख यांनी प्रभाग २२ मधून शीतल गायकवाड यांच्या उमेदवारीसाठी अखेरपर्यंत प्रयत्न केले. मात्र, त्यांना उमेदवारी मिळाली नाही. आता गायकवाड यांचा लढण्याचा पवित्रा कायम आहे. प्रभाग २३ मध्ये निर्मला गायकवाड, प्रभाग २४ मध्ये रश्मी विशाल गायकवाड आणि दैदीप्य वडापूरकर यांचा अपक्ष अर्ज आहे. देशमुखांनी प्रभाग २५ मधून वैभव हत्तुरे यांच्या उमेदवारीची शिफारस केली होती. मात्र, उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून अर्ज दाखल केला. मनीषा हुच्चे यांचा अपक्ष म्हणून अर्ज आहे. या सहा उमेदवारांपैकी प्रभाग २२, २४ मधील देशमुख समर्थकांचे अर्ज कायम राहिले, तर भाजपची अडचण होऊ शकते.
विजयकुमार गटाचे बंडखोर
प्रभाग ५ - ज्योती बमगोंडे, राजू आलुरे. प्रभाग ६ - कीर्ती शिंदे, सुदर्शना चव्हाण, केदार कराळे. प्रभाग ७ -श्रीकांत घाडगे. प्रभाग १० - संगीता केंजरला, नागेश वल्याळ, विजय इप्पाकायल, रवी नादरगी.
प्रभाग ११ - रोहन सोमा, भाग्यलक्ष्मी म्हंता, नागम्मा हुल्ले, सतीश भरमशेट्टी. प्रभाग १२ - काशीनाथ झाडबुके, मंदिरा साळुंखे, मल्लिकार्जुन पाटील. प्रभाग १३ - प्रतिभा मुदगल. प्रभाग १२ मधून राजेश अनगिरे यांनी शिंदेसेनेकडून अर्ज दाखल केला आहे.
राजू आलुरे यांनी गुरुवारी बाळे येथे बैठक घेऊन उमेदवारी कायम ठेवणार असल्याचे सांगितले. प्रभाग ६ मधून कराळे यांची उमेदवारी कायम ठेवल्यास भाजपची अडचण होणार आहे.
घाडगे यांची उमेदवारी डोकेदुखी ४ ठरू शकते. विडी घरकुल भागातील प्रभाग १० आणि ११ मध्ये बंडखोर कायम राहिल्यास भाजपच्या मतांचे विभाजन होऊ शकते.
बंडखोरांनी माघार न घेतल्यास कारवाई, भाजप शहराध्यक्षांचा इशारा : अर्ज मागे घेण्याचे आवाहन
भाजपच्या बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत, अन्यथा पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई होईल, असा इशारा शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी गुरुवारी दिला.
भाजप कार्यकर्त्यांना आवाहन करताना तडवळकर म्हणाल्या, शहरातील आमदारांनी आणि पक्षाच्या प्रदेश नेतृत्वाने जास्तीतजास्त कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी गैरसमज किंवा अन्यायाची भावना बाळगू नये.
शुक्रवारी त्यांनी माघार घ्यावी. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारात सहभागी व्हावे, अन्यथा पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, या इशाराचा परिणाम पहावा लागणार आहे.