Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 15:34 IST2025-12-31T15:32:12+5:302025-12-31T15:34:41+5:30
गणेश वानकर हे मागील २५ वर्षांपासून ठाकरेंच्या शिवसेनेत काम करत आहेत. ते शिवसेनेशी एकनिष्ठ होते, मात्र काल उमेदवारी भरण्याची वेळ संपल्यानंतर त्यांनी अचानक पक्षाला सोडचिट्टी दिली.

Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
महानगरपालिका निवडणुकांची राज्यात जोरदार तयारी सुरू आहे. भाजपा राज्यातील सर्वच महानगरपालिका ताकदीने लढवत आहे, राज्यात काही ठिकाणी महायुती एकत्रित निवडणुका लढत आहे, तर अनेक ठिकाणी भाजपाने स्वबळाचा नारा दिला आहे. सोलापूरमध्येही भाजपा स्वबळावर लढत आहे. दरम्यान, काल अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती. शेवटच्या दिवशी मोठ्या राजकीय हालचाली झाल्याचे पाहायला मिळाले. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश वानकर यांनी भाजपाकडून अर्ज दाखल केल्याचे समोर आले आहे, वानकर यांनी आज भाजपाकडून अर्ज दाखल केल्याचे जाहीर केले.
भाजपकडून ३२ उमेदवारांच्या एबी फॉर्मला उशीर; कल्याणशेट्टी, तडवळकरांना रोखले
गणेश वानकर हे मागील २५ वर्षांपासून ठाकरेंच्या शिवसेनेत काम करत आहेत. ते शिवसेनेशी एकनिष्ठ होते, मात्र काल उमेदवारी भरण्याची वेळ संपल्यानंतर त्यांनी अचानक पक्षाला सोडचिट्टी दिली. प्रभाग ६ मधील ४ उमेदवारांचे ठाकरे गटाचे एबी फॉर्म गणेश वानकर यांच्याकडे होते. ते फॉर्म त्यांनी भरले का? या बाबतीत सस्पेन्स होता. मात्,र आज याचा खुलासा करत ठाकरे गटाचे अर्ज न भरता भाजपाचे अर्ज भरल्याची कबुली दिली.
"मी ठाकरेंना आजही मानतो"
"गेली अनेक वर्ष विरोधी पक्षात होतो. मात्र प्रभागचे विकासकामे होत नव्हती, त्यामुळे भाजपकडून अर्ज दाखल केला असल्याचे वानकर यांनी सांगितले. माझ्या वडिलांनीही पक्षात काम केले आहे. पक्षाबद्दल आमची कोणतीही नाराजी नाही, नेता म्हणून आम्ही ठाकरेंना आजही मानतो. पण आमच्या मतदारसंघात विकासकामे करण्यासाठी निधिची मोठी गरज आहे. लोकांना दिलेली आश्वासने करता येत नव्हती, म्हणून मला आज भाजपामधून लढण्याची गरज वाटली, असंही वानकर म्हणाले.
"मला सगळ्याच पक्षाकडून ऑफर होती. मी जिल्हाप्रमुख म्हणून काम केले आहे. जो आम्हाला मानणारा वर्ग आहे. तो सर्व वर्ग आम्ही भाजपामध्ये विलिन केला आहे. सर्व भाजपाच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करणार आहे, असंही ते म्हणाले.