धक्कादायक; हिस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात मुलगा ठार; मोहोळ तालुक्यातील वाळुज येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2021 22:11 IST2021-01-26T22:10:41+5:302021-01-26T22:11:13+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

धक्कादायक; हिस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात मुलगा ठार; मोहोळ तालुक्यातील वाळुज येथील घटना
संभाजी मोटे
वाळूज : वाळूज (ता. मोहोळ ) येथील खरात वस्तीवर मंगळवारी दुपारच्या सुमारास हिस्त्र प्राण्याने केलेल्या हल्ल्यात एका दहावर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
अनिकेत अमोल खरात (वय १०) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मयत अनिकेत हा लहान भावंडासोबत वस्तीवर खेळत बसला होता. दरम्यान, अनिकेत हा प्रांतविधीसाठी मक्याच्या शेतामध्ये गेला असता परत येताना एका प्राण्याने त्याला मकाच्या फडात ओढत नेले. तेंव्हा इतर भावंडांनी आरडाओरड केली.
याबाबत माहिती मिळताच आई, वडील आणि आजोबा शेतात पोहचले तेंव्हा मुलाच्या डोक्यातून रक्तस्राव होत असल्याचे दिसून आले. तात्काळ त्यास उपचारासाठी मोहोळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल केले असता डॉक्टरांनी अनिकेत यास मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच वनविभागाची टिम वाळुज येथे दाखल झाली.
दरम्यान, हल्ला कोणत्या प्राण्याने केला हे अद्याप समजू शकले नाही. मयत अनिकेत हा आई, वडिलांना एकूलता एक मुलगा होता, त्याचे वडिल गुळवंची येथील माध्यमिक विद्यालयात सेवक पदावर कार्यरत आहेत. या घटनेची नोंद मोहोळ पोलीस स्टेशन येथे झाली आहे.