मोहोळमध्ये शिवसेनेला धक्का; राष्ट्रवादीचे यशवंत माने विजयी
By Appasaheb.patil | Updated: October 24, 2019 15:37 IST2019-10-24T15:34:54+5:302019-10-24T15:37:14+5:30
मोहोळ विधानसभा मतदारसंघ; अटीतटीच्या लढतीत माने यांचा २१ हजार २१९ मताने विजय

मोहोळमध्ये शिवसेनेला धक्का; राष्ट्रवादीचे यशवंत माने विजयी
सोलापूर : मोहोळविधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार यशवंत माने हे २१ हजार २१९ मतांची आघाडी घेत विजय मिळविला. या मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार नागनाथ क्षीरसागर यांना पराभव स्वीकारावा लागला असून त्यांना ६८ हजार १०६ मते मिळाली.
दरम्यान, राष्ट्रवादीचे यशवंत माने यांना ७९ हजार ३२५ मते मिळाली आहेत. तर अपक्ष रमेश कदम यांना २३ हजार ५२१ मते मिळाली. मोहोळ मतदारसंघात १४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते़ याच मतदारसंघात ९३१ मतदारांनी नोटाला मतदान केले आहे. राष्ट्रवादीच्या विजयानंतर अनगर, मोहोळ, वडाळा परिसरात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
शिवसेनेचे नागनाथ क्षीरसागर व राष्ट्रवादीचे यशवंत माने यांच्यात अटीतटीची लढत झाली होती़ गुरूवारी सकाळी आठच्या सुमारास मतमोजणीस सुरूवात झाली़ सुरूवातीपासूनच यशवंत माने यांना प्रत्येक फेरीत मताधिक्क मिळत होते़ मात्र शेवटच्या फेरीपर्यंत निकालाची उत्सुकता कायम होती. अखेर २० फेरीनंतर राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या विजयाचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगण्यात आले़. या अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीचे यशवंत माने विजयी झाले.