सरपंच पतीने केली ग्रामसेवकास बीडीओंसमोरच मारहाण; करमाळा तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 13:02 IST2021-06-29T13:01:49+5:302021-06-29T13:02:30+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग

सरपंच पतीने केली ग्रामसेवकास बीडीओंसमोरच मारहाण; करमाळा तालुक्यातील घटना
करमाळा : तू सरपंचाबाबत खोटे रिपोर्ट का देतो, माझी सही चालत नाही काय, असे म्हणून करंजे (ता. करमाळा) सरपंच पतीने ग्रामसेवकास गटविकास अधिकाऱ्यासमोर मारहाण केली आहे. याप्रकरणी सरपंच पतीवर शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
यात ग्रामसेवक अंगद बळीराम सरडे (वय ४६) चिखलठाण नं २ (ता.करमाळा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले की, मी पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी राजेंद्र भोंग यांच्यासमोर काम करत असताना काल (ता.२८) सकाळी ११ वाजता करंजे येथील राजेंद्र रूपचंद जाधव हा तिथे आला व आरे तुरेची भाषा बोलत... तु भालेवाडी-करंजे येथील सरपंचाबद्दल काही पण वरिष्ठ कार्यालय रिपोर्ट का देतो, माझी मंडळी सरपंच आहे, मी तिचा नवरा आहे, माझी सही तुला चालत नाही का ? बायकोच्या सहीची तुला काय गरज आहे व सरपंचाला तु हजर राहण्याबाबत नोटीस का देतो, पत्र व्यवहार का करतो ? असे म्हणून माझ्या अंगावर धावुन येवुन तोंडावर हाताने व डाव्या पायावर लाथाबुक्याने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप हे करत आहेत.