गुणवत्तेची ख्याती.. मेडद गावच्या तुपेवस्ती शाळेचं नाव सर्वमुखी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 12:19 PM2020-01-20T12:19:02+5:302020-01-20T12:21:24+5:30

नावीन्यपूर्ण शाळा; उपक्रमांवर भर, आयएसओ मानांकन प्राप्त माळशिरस तालुक्यात पहिली झेडपी शाळा

Renowned for its quality .. The name of the Tupavasti school in the village of Medad is well known | गुणवत्तेची ख्याती.. मेडद गावच्या तुपेवस्ती शाळेचं नाव सर्वमुखी 

गुणवत्तेची ख्याती.. मेडद गावच्या तुपेवस्ती शाळेचं नाव सर्वमुखी 

googlenewsNext
ठळक मुद्देअध्यापनाशिवाय शाळेनं शंकरराव मोहिते-पाटील गुणवत्ता  विकास अभियानात विभागीयस्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले उपक्रमशील, आदर्श शाळा म्हणून तालुका, जिल्हा, राज्यस्तरावर शाळेनं आपली मान उंचावलीमुलांना शाळा आपली वाटली पाहिजे यावर इथल्या शिक्षकांनी भर दिला  आहे

सोलापूर : जिल्ह्याचं शेवटचं टोक असणारा  माळशिरस तालुका...  इथल्या मेडद गावची इनमिन ८० कुटुंब असलेली झेडपीची तुपेवस्ती प्राथमिक शाळा... हरहुन्नरी... माळशिरस तालुक्यातील पहिली आय. एस. ओ. मानांकित शाळा... टेकडीवर वसलेली, वृक्षवेलींनी बहरलेली प्रतिमहाबळेश्वर वाटणारी शाळा. इथं इयत्ता पहिलीपासून ७ वीपर्यंत सेमी इंग्रजी माध्यमातून अध्यापनाचे धडे दिले जातात. 
डोंगरावर शाळा असल्याने पूर्वी माती नव्हती त्यावेळी शिक्षकांनी माती आणण्यासाठी १ मूल १ ढेकूळ ही योजना राबवली त्यामुळे टेकडीवर माती झाली व वनराईनं बहरली. 

मुलांनी एकदा का इयत्ता १ लीत  प्रवेश घेतला की तेव्हापासूनच मराठी माध्यमाशिवाय इंग्रजी भाषेची ओळख सुरु होते. गुणवत्तापूर्ण  शिक्षणपद्धतीमुळे अन्य गावची मुलं आजूबाजूची शाळा सोडून स्वत:च्या वाहनाने या शाळेत येतात. 

अध्यापनाशिवाय शाळेनं शंकरराव मोहिते-पाटील गुणवत्ता  विकास अभियानात विभागीयस्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले आहे.  ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धती, व्हॉट्सअ‍ॅप माध्यमातून स्वाध्याय, दीक्षा अ‍ॅप आॅफलाईन अभ्यासक्रम, आॅडिओ, व्हिडिओ अध्यापनात वापर मुलं अधिक चिकित्सक बनताना यावर आम्हा शिक्षकांचा विश्वास असल्याचे मुख्याध्यापिका इरफाना शेख    म्हणाल्या.  

उपक्रमशील, आदर्श शाळा म्हणून तालुका, जिल्हा, राज्यस्तरावर शाळेनं आपली मान उंचावली आहे. शाळा सिद्धी अभियानातून ‘अ’ श्रेणी प्राप्त केली आहे.   बालसभा, बाल आनंद मेळावा, वाढदिवस, दप्तरविना शाळा, पाककला स्पर्धा, शैक्षणिक सहल अशा उपक्रमातून मुलांना शाळा आपली वाटली पाहिजे यावर इथल्या शिक्षकांनी भर दिला  आहे.

ही आमची वैशिष्ट्ये
पहिली ते सातवी सेमी इंग्लिश माध्यम, ई लर्निंग, डिजिटल शाळा, सुसज्ज संगणक कक्ष, मुले, मुली व शिक्षकांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, परसबाग, हर्बल गार्डन, सोलापूर टॅलेंट हंट, व्यक्तिमत्त्व स्पर्धा, सलग तीनवेळा समूहगीत गायन, चित्रकला जिल्हास्तरावर प्रथम. गीत गायन, वक्तृत्व, बालनाट्य, एकपात्री नाटकामध्ये तालुक्याचे प्रतिनिधित्व केले आहे. याशिवाय स्पर्धा परीक्षांमधून सातारा सैनिक स्कूलसाठी १, नवोदय विद्यालय २, शिष्यवृत्ती परीक्षा १३, मंथन अशा स्पर्धांमध्ये इथल्या चिमुकल्यांनी स्वत:बरोबरच शाळेच्या शिरपेचात तुरा खोवला आहे. 

आमची शाळा एक 'शांती निकेतन'ची प्रतिकृती असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारी असून नवीन तंत्रज्ञानयुक्त ज्ञानरचनावादी शाळा आहे. यासाठी पालक, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षण विभागाचे प्रोत्साहन कायम मिळते.         
 - इरफाना शेख, मुख्याध्यापिका

शाळेचा परिसर निसर्गरम्य व उत्साहवर्धक आहे. शिक्षक कल्पक आणि उपक्रमशील आहेत. घरचा अभ्यास, शाळेतील उपक्रम पालकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केला जातो.
  - तानाजी टेळे, पालक 

लोकसहभाग उत्स्फूर्त
शाळेचे अंतरंग व बाह्यरंग रंगरंगोटी, ११ संगणक, १ प्रोजेक्टर, इन्व्हर्टर, ग्रंथालय पुस्तके, साऊंड सिस्टिम, लाकडी बाक, शैक्षणिक साहित्य अशा स्वरुपात पाच लाखांपर्यंत लोकसहभागातून जमले. याचा विद्यार्थ्याना फायदा होत आहे. पालकांना शाळेबद्दल अभिमान असल्याचे दिसून आले. 

Web Title: Renowned for its quality .. The name of the Tupavasti school in the village of Medad is well known

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.