Ramdan Eid: पापाभाई शेख यांचं सोशल मीडियात कौतुक, कालभैरव मंदिरात सेवेची दशकपूर्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 14:40 IST2022-05-03T14:37:35+5:302022-05-03T14:40:34+5:30
वाशिंबे येथील भैरवनाथ मंदिरात हिंदू-मुस्लिम ऐेक्याचं प्रतीक, पापाभाई शेख करतात 10 वर्षांपासून मंदिरात सेवा

Ramdan Eid: पापाभाई शेख यांचं सोशल मीडियात कौतुक, कालभैरव मंदिरात सेवेची दशकपूर्ती
सोलापूर - देशभरात आज मस्जिदवरील भोंगे, हनुमान चालीसा धर्माच्या नावाखाली समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. मनसेप्रमुख राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा उचलून धरल्यानंतर देशभरात काही ठिकाणी धार्मिक तणाव पाहायला मिळत आहे. या वातावरणातही करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथील पापाभाई शेख यांच्या कार्यामुळे हिंदू-मुस्लिम कशाप्रकारे गुण्यागोविंदाने राहू शकतात हे दिसून येईल. पापाभाई शेख यांनी आपल्या कामातून समाजाला माणुसकीचे, सर्वधर्मसमभावाचे दर्शन घडवून दिले आहे.
वाशिंबे येथे भिमा नदीकाठावर ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांचं मंदिर असून दरवर्षी हनुमान जयंतीला गावात यात्रा भरते. या यात्रेत सर्व जाती धर्माचे लोक पूर्ण भक्तिभावाने सहभागी होत असतात. परंतु, नवल वाटणारी गोष्ट म्हणजे या हिंदु मंदिरात पापाभाई चांदभाई शेख हे मुस्लिम भक्त असून गेल्या 10 वर्षांपासून ते मोठ्या भक्तिभावाने भैरवनाथ महाराजांची सेवा करत आहेत. सकाळी लवकर ऊठून देवाचे दर्शन घ्यायचे, मंदिरातील गाभाऱ्यापासुन ते मंदिरासमोरील सर्व परिसर स्वच्छ नीटनेटका ठेवण्याचे काम ते करतात.
पापाभाई शेख यांनी स्वत: पुढाकार घेऊन लोकवर्गणी गोळा करुन भैरवनाथ देवस्थान समितीच्या सहकार्याने मंदिर परिसरात भव्य प्रवेशद्वार व भक्तांना पिण्यासाठी पाण्याची टाकी बांधली आहे. मंदीर परिसरातील मोकळ्या जागेत सुमारे 600 झाडे लावली असून त्यांना पाणी घालण्याचं व दररोज झाडांची निगा राखण्याचं काम ते करत असतात. पापाभाई शेख यांच्या सेवेनं धार्मिक सहिष्णुतेचा आदर्श जगासमोर ठेवला आहे. त्यांच्या या सेवाभावामुळे आज सोशल मीडियातून त्यांच्या या कार्याचं कौतुक होत आहे.