Maharashtra Election 2019 : संजय निरुपमांची आता काँग्रेसला गरज नाही- सुशीलकुमार शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 17:07 IST2019-10-09T17:06:32+5:302019-10-09T17:07:18+5:30
Solapur Vidhan Sabha Election 2019 : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी संजय निरुपमांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Maharashtra Election 2019 : संजय निरुपमांची आता काँग्रेसला गरज नाही- सुशीलकुमार शिंदे
सोलापूर- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी संजय निरुपमांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी संजय निरुपमांवर टीका केली आहे. सुशीलकुमार शिंदे म्हणाले, त्यांना हवे असलेले उमेदवार न दिल्यानं ते अशी भूमिका मांडतात, पक्षाला त्यांची आता गरज नाही. असं बोलणाऱ्यांची काँग्रेस पक्षाला किती आवश्यकता आहे, याचा विचार करावा लागेल, असं म्हणत सुशीलकुमार शिंदेंनी संजय निरुपमांना घरचा आहेर दिला आहे.
तसेच यावेळी त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेस-राष्ट्रवादीनं एकत्र यावं, अशी भूमिका मांडली आहे. आता वाटतं आपण सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. दोन्ही काँग्रेसकडे एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही.पक्ष टिकवणं ही आजच्या परिस्थितीची गरज आहे. राहुल गांधींच्या प्रश्नावर ते म्हणाले, 13 ते 16 ऑक्टोबरदरम्यान राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.
तर दुसरीकडे सोलापूरमध्ये झालेल्या प्रचारसभेत त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीनं एकत्र येण्याचं सुचवलं होतं. कधीतरी एका झाडाखाली आम्ही वाढलेले आहोत, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलं आहे. प्रकृतीच्या दृष्टीने शरद पवारही आता थकले आहे. ज्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीची स्थापना झाली तो मुद्दा आता राहिलेला नाही, त्यामुळे भविष्यात दोन्ही पक्षाचे नेते एकाच व्यासपीठावर दिसतील, असा विश्वास सुशीलकुमार यांनी व्यक्त केला होता.