भाजपच्या एबी फॉर्मचा मुद्दा जाणार कोर्टात; मुख्य निवडणूक आयुक्तांना दिली लीगल नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 15:54 IST2026-01-01T15:54:21+5:302026-01-01T15:54:37+5:30
या नोटीसची प्रत मनपा आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांना देण्यात आली असल्याची माहिती शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे आणि काँग्रेसचे प्रवक्ते अशोक निंबर्गी यांनी दिली आहे.

भाजपच्या एबी फॉर्मचा मुद्दा जाणार कोर्टात; मुख्य निवडणूक आयुक्तांना दिली लीगल नोटीस
सोलापूर : भाजपने दुपारी ३ वाजल्यानंतर म्हणजे अर्ज करण्याची मुदत संपल्यानंतर एबी फॉर्म जमा केल्याचा आरोप महाविकास आघाडी आणि शिंदेसेनेने केला आहे. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी या प्रकरणात भाजपच्या बाजूने निर्णय देत असल्याचा आरोप करत मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी व सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांना विरोधकांनी लीगल नोटीस दिली आहे.
दरम्यान, महापालिका निवडणुकीसाठी भाजपचे आठ प्रभागांतील ३२ उमेदवारांचे एबी फॉर्म दुपारी ३ वाजता आले. उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ संपल्यानंतर भाजपचे लोक आले, असा आरोप करत विरोधकांनी आमदार व शहराध्यक्षांना रोखले होते. तरीही एबी फॉर्म खिडकीतून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवले गेले.
प्रकार बेकायदेशीर : अॅड. सरोदे
भाजपच्या उमेदवारांना दुपारी ३ वाजल्यानंतर खिडकीतून कागदपत्रे पुरवण्यात आली. हा संपूर्ण प्रकार बेकायदेशीर असून, निवडणूक निर्णय अधिकारी देखील भाजपच्याच बाजूने निर्णय देत आहेत. त्या स्वतः मान्य करतात की, ३ वाजल्यानंतर खिडकीतून कागदपत्रे आली आहेत.
मात्र ते एबी फॉर्म असल्याचे सिद्ध होत नाही म्हणत त्यांनी अर्ज वैध ठरवले आहेत. हे संपूर्णपणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी, मनपा आयुक्त आणि राज्य निवडणूक आयुक्त यांना कायदेशीर नोटीस पाठवल्याची माहिती अॅड. असीम सरोदे यांनी दिली.