सोलापूरसह अक्कलकोट तालुक्यात जोरदार पाऊस; शेतशिवारात पाणीच पाणी
By Appasaheb.patil | Updated: July 24, 2020 13:23 IST2020-07-24T13:21:17+5:302020-07-24T13:23:20+5:30
ओढे, नाले तुडूंब भरले; अक्कलकोटच्या ग्रामीण भागातील अनेक मार्ग वाहतूकीसाठी बंद

सोलापूरसह अक्कलकोट तालुक्यात जोरदार पाऊस; शेतशिवारात पाणीच पाणी
सोलापूर : मागील दोन दिवसापासून उकाड्याने त्रस्त झालेल्या सोलापूरकरांना शुक्रवारी काही प्रमाणात दिलासा मिळाला़ शुक्रवारी पहाटेपासूनच सोलापूर शहर व परिसरात पावसाने हजेरी लावली. दरम्यान, अक्कलकोट शहरासह संपूर्ण तालुक्यात पावसाने चांगलेच झोडपले़ जोरदार पडलेल्या पावसामुळे ओढे, नाले तुडूंब भरल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़ तर अक्कलकोट तालुक्यातील अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद झाल्याचीही माहिती समोर आली आहे.
शुक्रवारी पहाटेपासूनच रिमझिम पावसाला सुरूवात झाली होती़ कधी जोरदार तर कधी कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. दुपारी बाराच्या सुमारास सोलापूर शहरातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली, तर अक्कलकोट शहर व तालुक्यात सकाळपासूनच पावसाने झोडपले. सलगर, बावकरवाडी, शेगांव, नागणसूर, चप्पळगांव, बोरगांव, वागदरी, शिरवळ, घुंगरेगाव, शावळ, आंदेवाडी आदी गावांना पावसाने चांगलेच झोडपले. काही गावात पाणी शिरले तर ओढ्यावरून जास्त प्रमाणात पाणी वाहू लागल्याने एका गावांहून दुसºया गावांना जाणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले.
सकाळपासून पडत असलेला पाऊस शेतकºयांसाठी लाभदायक असला तरी काही गावातील शेतात पाणीच पाणी झाल्याने शेतातील पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. काही भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून सलगर, शेगांव, चप्पळगांव, नागणसूर आदी गावातील घरांमध्ये पाणी शिरल्याचे सांगण्यात आले आहे.