झेल घेताना पडून तरुणाचा मृत्यू, क्रिकेट खेळताना घडली दुर्घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 17:30 IST2022-05-21T17:29:44+5:302022-05-21T17:30:21+5:30
बार्शीतील घटना; लोखंडी पाईपवर पडल्याने पोटाला दुखापत

झेल घेताना पडून तरुणाचा मृत्यू, क्रिकेट खेळताना घडली दुर्घटना
सोलापूर : क्रिकेट खेळातील झेल पकडत असताना लोखंडी पाईपवर पडून गंभीर जखमी झालेल्या सोळा वर्षीय युवकाचा शुक्रवारी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. अख्तर जावेद तांबोळी (वय १६, रा. उपळे, ता. बार्शी ) असे मयत युवकाचे नाव असून, बार्शी येथे गुरुवारी क्रिकेट खेळताना ही दुर्घटना घडली होती.
मयत अख्तर तांबोळी हा मूळ सोलापूरचा. त्याचे आई-वडील कामानिमित्त मुंबई येथे गेले होते. त्याच्या बहिणीच्या उपचारासाठी हे कुटुंबीय सोलापुरात आले. त्यानंतर ते येथेच स्थायिक झाले. दरम्यान, अख्तर हा गुरुवारी १९ रोजी क्रिकेट खेळण्यासाठी आपल्या मित्रांसोबत गेला. त्यावेळी तो एका लोखंडी पाईपवर पडला. यामुळे त्याच्या पोटात गंभीर दुखापत झाली. त्याने घरी आल्यानंतर आईला सांगितल्यानंतर तिने गावातील एका खासगी रुग्णालयात त्याला दाखविले. जास्त त्रास होऊ लागल्याने त्याला बार्शी येथे हलविण्यात आले; पण प्रकृती खालावत गेल्यामुळे त्याला डॉक्टरांनी ऑपरेशन करण्यास सांगितले. त्याला उपचारासाठी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मनमिळाऊ मुलगा
अख्तर तांबोळी हा मुंबईत नववीमध्ये शिकत होता. तो खूप मनमिळाऊ आणि हळव्या मनाचा होता. त्याच्या मृत्यूची घटना जेव्हा नातेवाईकांना आणि परिसरातील नागरिकांना कळाली तेव्हा हळहळ व्यक्त झाली. त्याच्यावर शनिवारी अंत्यसंस्कार होणार आहेत.