50 अधिकाऱ्यांचं छोटसं खेडेगाव; ZP च्या 'या' शाळेनं घडवले IAS अन् IPS
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 13:59 IST2022-12-26T13:57:18+5:302022-12-26T13:59:49+5:30
स्पर्धा परीक्षांची पंढरी म्हणून माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक गावची ओळख आता राज्याच्या प्रशासनात बनली आहे.

50 अधिकाऱ्यांचं छोटसं खेडेगाव; ZP च्या 'या' शाळेनं घडवले IAS अन् IPS
लक्ष्मण कांबळे
सोलापूर - कधी काळी दुष्काळी पट्टा असा कायमस्वरुपी शिक्का लागलेल्या उपळाई बुद्रुकची ओळख आता स्पर्धा परीक्षेची पंढरी अशीच बनली आहे. या गावात ३ आयएएस, १ आयआरएस व १ आयपीएस असे प्रशासनातील उच्च अधिकारी आहेत. शिवाय ५० हून अधिक जण अधिकारी बनले आहेत. माढा शेटफळ रस्त्यावर नऊ हजार लोकसंख्या असलेले उपळाई बुद्रुक हे गाव आहे. युवकांच्या सनदी अधिकारी' होण्याच्या प्रवासात यशात मोठा वाटा आहे, तो गावातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा अन् रयत शिक्षण संस्थेच्या नंदिकेश्वर विद्यालयाचा.
स्पर्धा परीक्षांची पंढरी म्हणून माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक गावची ओळख आता राज्याच्या प्रशासनात बनली आहे. या गावात प्रशासनातील उच्चपदस्थ अशा तब्बल ५० अधिकाऱ्यांचं घर आहे. गावाने प्रशासनातील अधिकाऱ्याचं अर्धशतक झळकावलं असून यात महिला आयएसएस अधिकारी रोहिणी भाजीभाकरे याही याच गावच्या कन्या आहेत. तर, त्यांचे बंधु संदीप भाजीभाकरे हेही आयपीएस आहेत. त्यामुळे, या गावच्या मातीची गोष्टच निराळी आहे.
प्रचंड कष्ट, जिद्द, चिकाटी व परिश्रम हे उपळाईतील युवकांच्या यशाचे गमक आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करत गावातील युवकांनी यश संपादन केले आहे. अधिकारी झालेल्या युवकांची नागरिक गावातून मिरवणूक काढतात. त्यातून इतरांना प्रेरणा मिळत आहे. गेली दहा ते पंधरा वर्षांपासून स्पर्धा परीक्षेतील उपळाईच्या यशाचा झेंडा युवकांनी कायम ठेवला आहे, असे डॉ. संदीप भाजीभाकरे, पोलीस उपायुक्त, मुंबई यांनी लोकमतशी बोलताना म्हटले.
राज्य प्रशासनातील कार्यरत अधिकारी
पोलिस उपनिरीक्षक अनिल शेळके, किशोर वागज, शिरीष शिंदे, राकेश शिंदे, शिवानंद झाडबुके, अमित देशमुख, तर करनिर्धारण अधिकारी म्हणून प्रज्ञा देशमुख, भाग्यश्री बेडगे, कक्ष अधिकारी संदीप कदम, अशोक बाबर, वनक्षेत्रपाल अधिकारी वैभव सातपुते, नूतन विक्रीकर निरीक्षक, मंत्रालय सहायक धनश्री डुचाळ, पोलि उपनिरीक्षक धनाजी शिंदे यांच्यासह ५०हून अधिक इतर अधिकारी, त्याचबरोबर ५०हून अधिक इंजिनियर, प्राध्यापक, शिक्षक, पोलिस व सैन्य दलात अनेक शिक्का युवक कार्यरत आहेत, याचा गावाला अभिमान आहे.
1 डॉ. संदीप रामदास भाजीभाकरे यांनी त्यांचे एमबीबीएसचे शिक्षण झाल्यानंतर पहिल्या प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पोलिस उपअधीक्षक पदाला गवसणी घातली. त्यानंतर त्यांची बहीण रोहिणी भाजीभाकरे यांनी तर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आयएएस पद पादाक्रांत केले.
2 शिवप्रसाद मदन नकाते व स्वप्नील शरदराव पाटील दोघांनीही एकाचवेळी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनुक्रमे आयएएस व आयआरएस पदात यश मिळविले.
3 मीनाक्षी तानाजी वाकडे यांची राज्यसेवेतून वित्त व लेखा अधिकारी, तर अमरदीप वाकडे यांची तहसीलदार म्हणून निवड झाली.
4 संजय वाकडे यांची तालुका कृषी अधिकारी, तर श्रीकृष्ण नीळकंठ नकाते यांची सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून निवड झाली.
■ मध्यंतरीच्या काळात यशस्वी होण्यात थोडा खंड पडला होता. तोही लागलीच डॉ. अश्विनी तानाजी वाकडे यांनी भरून काढला अन् पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर उपळाई बुद्रुकचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले गेले. त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 'आयएएस' पदाला गवसणी घातली.
| माढासारख्या ठिकाणीही येथील प्रमोद शिंदे हे कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत.
■ सचिन कवले यांचे भाऊ नितीन कवले यांनीदेखील या सर्वांची प्रेरणा घेऊन सहायक कामगार आयुक्त परीक्षेत यश मिळवले आहे. राज्य पातळीवरच नव्हे, तर देशभर गावची वेगळी ओळख