दोन दुचाकी चोरांना पकडले; १४ दुचाकी जप्त; सांगोला पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2021 20:09 IST2021-11-23T19:50:58+5:302021-11-23T20:09:53+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

दोन दुचाकी चोरांना पकडले; १४ दुचाकी जप्त; सांगोला पोलिसांची कारवाई
सांगोला : सांगोला पोलिस स्टेशनतंर्गत शहर बीटसह डीबी पथकाने धडाकेबाज कामगिरी करीत बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे व सायबर पोलिसांच्या मदतीने दुचाकी चोरीचे गुन्हा उघडकीस आणून दोन दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून सुमारे ७ लाख १५ हजार रुपये किंमतीच्या विविध कंपनीच्या १४ दुचाकी जप्त केल्या आहेत.
पोलिसांनी या गुन्ह्यात सत्यवान बजरंग इंगवले (रा.मेडशिंगी ता. सांगोला) व रोहन मारुती गायकवाड (रा. मांजरी बुद्रुक हडपसर जि. पुणे) या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून पंढरपूर, सांगोला पुणे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चोरीला गेलेल्या दुचाकीचे गुन्हे उघडकीस येणार असल्याचे माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान दुचाकी चोरीला गेलेल्या मालकांनी सांगोला पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी केले आहे. या गुन्ह्याचा तपास हवालदार सचिन वाघ करीत आहेत. ही कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव ,उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर, हवालदार सचिन वाघ, अस्लम काझी, बीबी पथकाचे पोलीस नाईक राहुल कोरे, पोलीस नाईक सचिन हेंबाडे, पोलीस कॉन्स्टेबल अमर पाटील यांच्यासह सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल अन्वर आत्तार यांनी केली आहे.