Sindhudurg: पूजेसाठी फुले काढायला गेले अन् विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 17:55 IST2025-08-30T17:53:31+5:302025-08-30T17:55:39+5:30
पावसामुळे विजेची एक तार तुटून पडली होती झाडावर

Sindhudurg: पूजेसाठी फुले काढायला गेले अन् विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू
कुडाळ : तालुक्यातील झाराप - शिरोडकरवाडी येथे देवाच्या पूजेसाठी फुले काढायला गेलेले प्रताप वासुदेव कुडाळकर (वय ६०) यांचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी ७:०० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
प्रताप कुडाळकर हे रोजच्याप्रमाणे आपल्या बागेत फुले आणण्यासाठी गेले होते. रात्री झालेल्या पावसामुळे, विजेची एक तार तुटून पोफळीच्या झाडावर पडली होती. कुडाळकर यांच्या खांद्याला ती तार लागल्याने त्यांना विजेचा तीव्र धक्का बसला आणि ते तिथेच कोसळले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम आणि झारापचे बीट हवालदार अनिल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला आहे. तसेच, वीज वितरण विभागाचे कार्यकारी अभियंता आनंद वनमोरे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कुडाळकर यांच्या पश्चात पत्नी आणि मुले असा परिवार आहे.